अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बनावट आधारकार्डचा वापर करून खरेदी केलेल्या सीमकार्डव्दारे अहिल्यानगर शहरातील व्यापार्यास जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. अजय अरुण साळवे (वय 42, रा. माधवबाग, आलमगीर, भिंगार) पवन प्रमोद उघडे (वय 24, रा. सदरबाजार, भिंगार) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी व्यापारी किरण मोहनलाल राका (वय 56 रा. आदर्श कॉलनी, अहिल्यानगर) यांना खंडणी मागण्यासाठी धमकी दिली असल्याची कबुली दिली आहे. किरण राका हे 14 डिसेंबर रोजी रात्री सर्जेपुरा येथून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना रस्त्यात अडवून ‘भाई का फोन आयेगा उठालो’ असे म्हणाले व निघून गेले होते.
त्यानंतर राका यांना मोबाईलवर मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी राका यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष खैरे, सागर ससाणे, रवींद्र घुंगासे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व महादेव भांड यांचे पथक या गुन्ह्याचा तपास करत होते. बुधवारी (18 डिसेंबर) पथकाने घटनाठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपींची माहिती घेतली असता संशयित आरोपी हे रामवाडी रस्ता, तारकपूर येथे विना क्रमांकाच्या दुचाकीसह थांबले असल्याची माहिती मिळाली. पथकाने रामवाडी रस्त्यावरून संशयित दोघा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दुचाकी, दोन मोबाईल, आधारकार्ड, पॅनकार्ड व बँक पासबुक, एक रबरी स्टॅम्प, अनोळखी इसमाचे फोटो असा 82 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बनावट आधारकार्ड तयार करून घेतले सिमकार्ड
ताब्यात घेतलेल्या अजय साळवे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने खोट्या कागदपत्रांचा वापर करून दीपक राजू भुजबळ (रा. घासगल्ली, कोठला) यांचे विजय अरूण नवगिरे (रा. कल्याण रस्ता, शिवाजीनगर) या नावाने बनावट आधारकार्ड तयार केले. त्या बनावट आधारकार्डच्या आधारे वेगवेगळी कागदपत्रे तयार केली. साळवे याने व्यापारी किरण राका यांच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी बनावट कागदपत्रावरून सिमकार्ड घेतले. 14 डिसेंबर रोजी रात्री पवन उघडे याच्यासह दुचाकीवर जाऊन राका यांना रस्त्यात अडवून धमकावले व नंतर मोबाईलव्दारे खंडणी मागण्याकरिता धमकी दिल्याची कबूली दिली.