मुंबई । Mumbai
महाराष्ट्र विधान परिषदेत मंगळवारी एक अत्यंत दुर्मिळ आणि भावूक प्रसंग पाहायला मिळाला. शिवसेना (यूबीटी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील ८ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्याबद्दल काढलेल्या गौरवौद्गारांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यातील ‘कलाकार’ पैलूचे भरभरून कौतुक केले.
उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांच्या स्वभावात राजकारण कमी आणि एका संवेदनशील कलाकाराचे मन जास्त दडलेले आहे. ठाकरे हे केवळ एक राजकीय नेते नसून ते एक जागतिक दर्जाचे छायाचित्रकार आहेत, ज्यांनी महाराष्ट्राची संस्कृती आणि निसर्ग आपल्या कॅमेऱ्यात अचूक टिपला आहे. विशेषतः पंढरपूरच्या वारीचे चित्रीकरण करण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरमधून घेतलेली जोखीम त्यांच्या कलेप्रती असलेल्या अफाट प्रेमाची साक्ष देते, असे फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या वारशाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, एकदा निर्णय घेतला की परिणामांची पर्वा न करता त्यावर ठाम राहण्याचा गुण उद्धवजींना आपल्या वडिलांकडून मिळाला आहे. हा बाणेदारपणा त्यांच्या कार्यपद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. या निरोप समारंभाच्या निमित्ताने सभागृहात काही काळ राजकीय टीकाटिप्पणी विरून जाऊन केवळ आदराची भावना पाहायला मिळाली.
आपल्या भाषणात फडणवीस यांनी २०१४ मधील युतीचा काळ आणि २०१९ मध्ये निर्माण झालेला राजकीय दुरावा यावरही मिश्किल भाष्य केले. ज्यांना माझा हात धरून चालायचे होते, ते एखाद्या गोष्टीवर अडून बसले, अशा शब्दांत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. राजकारणात विचारधारेचे मतभेद असू शकतात, कधी आपण सत्तेत सोबत असतो तर कधी विरोधात असतो, पण या पलीकडे एकमेकांचे सहप्रवासी म्हणून असलेले नाते महत्त्वाचे असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे हे शब्दांचे पक्के असून नाते जपण्याचा त्यांचा मूळ स्वभाव असल्याचेही त्यांनी मान्य केले.
यावेळी फडणवीस यांनी आपल्या प्रसिद्ध ‘पुन्हा येईन’ या वाक्याला एक वेगळी कलाटणी दिली. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेत निवडून यावे, अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी ठाकरे यांना ‘पुन्हा भेटू’ अशी साद घातली. उद्धव ठाकरे यांना सभागृहात ऐकणे हा नेहमीच एक वेगळा अनुभव असतो, त्यामुळे त्यांनी पुढील सहा वर्षांच्या कार्यकाळासाठी पुन्हा सभागृहात यावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. या मैत्रीपूर्ण संवादामुळे विधान परिषदेतील वातावरण अत्यंत खेळीमेळीचे झाले होते.




