अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून युवतीला (वय 23) वारंवार धमकीचे व अश्लील मेसेज पाठविण्यासह तिच्या फोटोंचा गैरवापर करून एआयच्या माध्यमातून अश्लील फोटो तयार करून ते नातेवाईकांना पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून येथील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर शहरात राहणार्या पीडित युवतीने सोमवारी (5 ऑक्टोबर) याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, 28 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बनावट अकाउंटवरून मेसेज येण्यास सुरूवात झाली.
या अकाउंटवरून इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यास तसेच एका तरूणाचे नाव घेऊन त्याच्याशी लग्न करू नये, अन्यथा तिला पळवून नेण्याची, लग्न मोडण्याची आणि समाजात बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. फिर्यादीने संबंधित अकाउंटधारकाची ओळख जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आपली ओळख सांगण्यास नकार दिला. त्यामुळे फिर्यादीने ते अकाउंट ब्लॉक केले.
दरम्यान, त्यानंतरही संबंधित व्यक्तीने वारंवार नवीन इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावरून धमकीचे व अश्लील मेसेज पाठविण्यास सुरूवात केली. तसेच फिर्यादीच्या भावालाही संबंधित अकाउंटवरून मेसेज येऊ लागले. भावानेही अकाउंटधारकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने ओळख लपवत वारंवार अकाउंट बदलल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
एआयच्या माध्यमातून अश्लील फोटो
संबंधित व्यक्तीने फिर्यादीचे फोटो मिळवून त्यांचा गैरवापर केला. एआयच्या माध्यमातून हे फोटो अश्लील स्वरूपात तयार करून ते फिर्यादीसह तिचा भाऊ, होणारा पती तसेच इतर नातेवाईकांना पाठविण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे फिर्यादीची बदनामी झाली असून, या प्रकारामुळे आपल्याला लाज व किळस वाटत असल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले अधिक तपास करीत आहेत.




