Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याकांदा भाव घसरणीचा परिणाम गृहकलहात

कांदा भाव घसरणीचा परिणाम गृहकलहात

नाशिक। विजय गिते Nashik

कांदा बाजारभाव हुलकावणीला अन् त्यातून होणार्‍या मानसिक छळवणूकीला कांदा उत्पादक आता जाम कंटाळले आहेत.त्यांचा कांदा साठवणीचा संयम तुटला आहे.

- Advertisement -

एक मात्र खरे विकतांना भाव पाडणार्‍या सर्व घटकांना लक्षात ठेवून, नाराजीत अगतिक होऊन माल विकत आहेत.क्विंटलला आठ हजार रुपयांपर्यंत गेलेले कांद्याचे दर आता तीन ते चार हजार रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत. यामुळे कांदा उत्पादकांच्या घरात तुम्हीच कांदा ठेवायला लावला या मुद्द्यावरून गृहकलह सुरू झालेला आहे.

त्यामुळे कांदा भावातील चढउतार ही आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या हातातील गोष्ट नाही.घरातील सदस्य शेतीसंबंधी जे एकत्रित निर्णय घेतात, ते सर्वाच्या हितासाठी घेतले जातात.आज जी कांद्याच्या भावाची अवस्था झाली आहे. ती फक्त केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरणे हेच एकमेव कारण आहे.त्यामुळे उगाच कांदा भावाचा संबंध गृहकलह निर्माण करण्यासाठी करू नये,अशी भावनिक सादवजा सल्ला कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या घरातील बुजूर्गांकडून दिला जात असल्याचे चित्र आहे. कांदा हे आपले मुख्य पीक. त्यावरच आपले कुटुंब आणि आपला उदरनिर्वाह आहे.हे जरी खरे असले तरी आता जर आपले निर्णय फसले असतील तर घरात वाद घालू नका,अजून आपण संपलेलो नाही,पुढेही आपण कांदा लावणार आहोत व विकणार ही आहोत.असा धीर दिला जात आहे.

यावर्षी माल शेतकर्‍यांकडेच आहे.व्यापार्‍यांना दास्तान (साठवणूक) करण्यासाठी शेतकर्‍यांनी यावर्षी संधी दिली नाही.एकीकडे व्यापारी माल खेचण्यासाठी मीडिया, संप इत्यादी मार्ग अवलंबत आहेत.तर दुसरीकडे मात्र शेतकरी भाव मिळण्यासाठी कोणत्याही खेळीला बळी पडत नाही.अशी दोघात झुंज चालु आहे.

आयात हे वृत्त म्हणजे शेतकर्‍यांची फसवणूक करण्याची एक छुपी चाल आहे.तसे पहायला गेले तर आयात कांदा म्हणजे देशाची एका दिवसाची गरज आहे.त्यामुळे भावावर परिणाम होऊ शकत नाही.मात्र,एवढे समजूनही काही शेतकरी वेडेपणा करतच असुन व्यापारी, सरकार, मीडिया यांच्या खेळीला बळी पडून मार्केटला माल नेत आहेत. असे जाणकारांचे मत आहे.इतके दिवस थांबलात अजून 10-12 दिवस थांबता येत नाही काय? नंतर भाव, वातावरण पाहून निर्णय घ्या ना ! असा सल्लाही त्यांच्याकडून दिला जात आहे.

असे किती दिवस चालायचे ?

कांदा उत्पादकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार सध्या सुरू आहे.यातून त्याचे आर्थिक नुकसान होईल.अशा नुकसानीची आम्हाला आता सवय झालेली आहे. त्यामुळे विशेष फरक पडणारही नाही.पण त्याच्याशी खेळणार्‍यांना नक्कीच फरक पडेल.पण शेतकर्‍याच्या मनाची मात्र ही वस्तुस्थिती आहे. असे किती दिवस चालायचे? शेतकर्‍याने आनंदाने दिले तर लखलाभ होतो.ते अंगीही लागते.अन नकळत हिसकावले तर काय होते? याची जाण हिसकावणार्‍यांनी ठेवावी.

भाऊसाहेब सोनवणे ,कांदा उत्पादक

- Advertisment -

ताज्या बातम्या