Monday, September 16, 2024
Homeक्राईमशेतकर्‍याचे दिवसा घर फोडणारे दोघे सराईत अटकेत

शेतकर्‍याचे दिवसा घर फोडणारे दोघे सराईत अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी || सोने, रोकड हस्तगत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर तालुक्यातील जांब शिवारात शेतकर्‍याचे घर फोडून पाच लाख 73 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 15 ग्रॅम सोन्याचे दागिने व 10 हजारांची रोकड असा एक लाख 15 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तुषार हबाजी भोसले (वय 23 रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड) व कानिफ उध्दव काळे (वय 22 रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

दत्तात्रय आसाराम पवार (वय 57) हे कुटुंबियांसह घराच्या पाठीमागील शेतात काम करत असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे लॉक तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कमेसह पाच लाख 73 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रवींद्र कर्डिले, मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, संदीप दरंदले, विजय ठोंबरे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, विशाल तनपुरे, मेघराज कोल्हे, अरुण मोरे यांचे पथक तपासकामी नियुक्त करण्यात आले होते.

गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्हा उघडकीस आणण्याच्यादृष्टीने संशयित आरोपींचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार तुषार भोसले व कानिफ काळे यांनी केला असून ते नगर – जामखेड रस्त्यावरील मुठ्ठी चौकात सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आहेर यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला खात्री करून कारवाईचे आदेश दिले. पथकाने मुठ्ठी चौकात सापळा रचून भोसले व काळे यांना ताब्यात घेतले. त्यांनी जांब येथे घरफोडी केल्याची कबुली देत चोरीचे सोने व रोकड काढून दिली. दरम्यान भोसले व काळे हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. भोसले विरोधात नगर जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे 23 गुन्हे दाखल आहेत. तसेच काळे विरोधात नगर व बीड जिल्ह्यात दरोड्याची तयारी, दरोडा व खून असे तीन गुन्हे दाखल आहेत.

तालुका पोलिसांचे अपयश
नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात चोर्‍या, घरफोड्या, जबरी चोर्‍या वाढल्या असून त्या गुन्ह्यांची उकल करण्यात नगर तालुका पोलिसांना अपयश आले आहे. गंभीर गुन्हे घडून देखील तालुका पोलिसांकडून त्याची उकल होत नसल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. दिवसा शेतकर्‍यांची घरे फोडली जात आहेत. शेती उपयोगी साहित्यांची चोरी केली जात असून तालुका पोलिसांकडून या चोरट्यांचा बंदोबस्त केला जात नसल्याने शेतकर्‍यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या