चंद्रपूर | Chandrapur
चंद्रपूरमधून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे. कर्जाचा परतावा फेडण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप संबंधित शेतकऱ्यानेच केला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
नागभीड तालुक्यातील मिंथुर येथे राहणाऱ्या रोशन कुडे या शेतकऱ्याने हा आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी रोशन याने दुधाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपये व्याजाने खाजगी सावकाराकडून घेतले होते. मात्र, दुर्दैवाने त्याची जनावरे मेली आणि तो सावकारचे कर्ज फेडू शकला नाही. तेव्हापासून या खाजगी सावकाराने वारंवार पैसे देण्याचा तगादा लावला. मात्र कर्जाचा बोजा वाढत गेल्यामुळे आणि व्याजाची रक्कम प्रचंड वाढली. यानंतर सावकाराने वारंवार रोशनकडे पैशांसाठी तगादा लावला. पण रोशन यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नसल्याने ते सावकाराचे कर्ज फेडू शकले नाहीत.
सावकाराचा शेतकऱ्याला किडनी विकण्याचा सल्ला
अखेर त्या सावकाराने पैसे फेडण्यासाठी शेतकऱ्याला त्याची किडनी विकण्याचा सल्ला दिला. सावकाराच्या जाचाला कंटाळून आणि दुसरा कोणताही पर्याय नसल्याने, पीडित शेतकऱ्याने सावकाराच्या सल्ल्यानुसार रोशन कुडे या शेतकऱ्याने आधी कोलकाता आणि नंतर तिथून कंबोडिया येथे जाऊन ८ लाख रुपयांना स्वत:ची किडनी विकली. सावकारामुळेच माझ्यावर ही वेळ आल्याचा आरोप करत पीडित शेतकऱ्याने सावकारावर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
एकीकडे राज्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाता मारल्या जात असतानाच ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे प्रश्न किती भीषण आहेत आणि त्यांची अवस्था किती दयनीय आहे, हे या घटनेमुळे पुन्हा एकदा दिसून आले आहे. आता यावर राज्य सरकार आणि कृषीमंत्री किती तत्परतेने कारवाई करणार आणि संबंधित सावकाराला काय शिक्षा देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




