Tuesday, March 25, 2025
Homeनगरटोमॅटोची नासाडी केल्याने शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान

टोमॅटोची नासाडी केल्याने शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान

तिगाव शिवारातील घटना || खोडसाळ कृत्याने शेतकरी हवालदिल

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील तिगाव शिवारात अज्ञात व्यक्तीकडून एका शेतकर्‍याच्या शेतातील 30 गुंठे क्षेत्रात लागवड केलेले टोमॅटो पिक रात्रीच्या सुमारास उपटून फेकले. शेतातील शेततळ्याचा कागदही फाडला आणि इतर साहित्याची नासाडी करीत मोठे नुकसान केले. मंगळवारी (दि. 4 जून) सकाळी सात वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अज्ञात व्यक्तीच्या या धक्कादायक खोडसाळ कृत्याने शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावांतर्गतच्या धनगरवाडा येथे अंजाबापू रंभाजी कांदळकर यांनी दुष्काळी परिस्थिती आणि कडक उन्हाळा असतानाही नजीकच असलेल्या तिगाव गावच्या शिवारात गट क्रमांक 262 मधील शेतात 30 गुंठे क्षेत्रात टोमॅटो आणि 20 गुंठे क्षेत्रात वांगी पिकाची लागवड केलेली आहे. शेतात टोमॅटो आणि वांगी पीक जोमात बहरले असताना सोमवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेतातील टोमॅटो झाडे उपटून टाकली. मोठ्या प्रमाणात वांगी पिकाचेही नुकसान केले. शेततळ्यातील कागद आणि शेतात पिकासाठी वापरलेला मल्चिंग पेपर फाडला. ड्रीपसाठी जोडलेल्या पीव्हीसी पाईपचे तुकडे केले. पाणी फिल्टर, दोनशे लिटर पाण्याची टाकी व साहित्यांचे नुकसान केले. टोमॅटो आणि वांगी पिकापासून कांदळकर यांना मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र, अज्ञात व्यक्तीने टोमॅटो आणि वांगी पीक व साहित्याचे नुकसान केल्यामुळे अंदाजे साडेसहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी अंजाबापू कांदळकर यांनी सांगितले.

सदर प्रकारची माहिती समजताच तळेगाव दिघे ग्राम तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मधुकर दिघे, रावसाहेब कांदळकर, ज्ञानेश्वर कांदळकर यांसह कार्यकर्त्यांनी सदर शेतास जावून टोमॅटो आणि वांगी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यापूर्वीही अज्ञात व्यक्तीने अंजाबापू कांदळकर यांच्या शेतातील शेततळ्यातील कागद फाडून पाण्याची नासाडी केली होती. याबाबत त्यांनी संगमनेर तालुका पोलिसांकडे तक्रार नोंदवलेली आहे. त्यानंतर पुन्हा टोमॅटो पिकाचे आणि साहित्याचे नुकसान करण्यात आले. वारंवार केल्या जाणार्‍या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पीक आणि साहित्याचे नुकसान करणार्‍या अज्ञात व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा आणि आपणास नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी अंजाबापू कांदळकर यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Kunal Kamra : “हम होंगे कंगाल…”; कुणाल कामराची नवी पोस्ट, स्टुडिओतील...

0
मुंबई | Mumbai स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने (Kunal Kamra) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केल्याने नवा वाद...