Tuesday, May 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकमध्ये भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आ. रोहित पवार यांनी शेतकऱ्यांची घेतली भेट

नाशिकमध्ये भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आ. रोहित पवार यांनी शेतकऱ्यांची घेतली भेट

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराबाहेर प्रस्तावित असलेल्या रिंगरोड आणि एमआयडीसी भूसंपादन प्रक्रियेविरोधात बाधित शेतकऱ्यांनी आरपारची लढाई सुरू केली आहे. या अन्यायकारक भूसंपादनाविरोधात २१ गावांतील शेतकऱ्यांनी आज, मंगळवार (दि. २६) पासून पंचवटीतील पवित्र रामकुंड येथील दुतोंड्या मारुती मंदिराजवळ थेट ‘आमरण उपोषण’ सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून, आता या आंदोलनाला राजकीय पाठिंबाही मिळू लागला आहे.

सध्या सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्णपणे अव्यवहार्य, शेतकरीविरोधी आणि बेकायदेशीर असल्याचा संतप्त आरोप आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे. दिंडोरी रोड, त्र्यंबक रोड आणि सिन्नर रोड परिसरात आधीच ‘डीपी रोड’ (विकास योजना रस्ता) उपलब्ध असताना, स्वतंत्र रिंगरोड उभारून सुपीक जमिनी हिरावून घेण्याची काय आवश्यकता आहे? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

प्रस्तावित रिंगरोडच्या परिसरात काही बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी आधीच शेकडो एकर जमिनी स्वस्तात खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. तसेच, भूसंपादनातील मोबदला रकमेत मोठ्या प्रमाणावर तफावत असून, याला जबाबदार असलेले प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई का करण्यात आलेली नाही? असा प्रश्न उपस्थित करत ही प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली.या आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते साहेबराव दातीर,ॲड. कैलास खांडबहाले, विनोद नाठे, संतोष सहाणे, विष्णू कोकणे, ज्ञानेश्वर चौधरी, राजू जाधव, भास्करराव उगले यांच्यासह २१ गावांतील शेकडो बाधित शेतकरी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

महाविकास आघाडीच्या बैठकीत विषय मांडणार : शशिकांत शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी उपोषणस्थळी थेट भेट देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. “शेतकऱ्यांवर होणारा हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. लवकरच महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होत असून, यात नाशिकच्या भूसंपादनाचा विषय आम्ही प्रामुख्याने मांडू. सरकारने जर शेतकऱ्यांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही सर्व शक्तीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,” असे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले.

आ. रोहित पवार यांनीही उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट
आमदार रोहित पवार यांनीही उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. “जर सरकार आणि अधिकारी शेतकऱ्यांचे हित पाहण्याऐवजी बिल्डर व भूमाफियांना आश्रय देत असतील, तर आम्ही ते खपवून घेणार नाही. शहरातील वृक्षतोड, रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि यातील भ्रष्टाचार हे सरकारच्या ढिसाळ नियोजनाचे अपयश आहे,” असे रोहित पवार म्हणाले.

…आणि रोहित पवारांनी पकडली ऑटो रिक्षा!
“मुख्यमंत्री जर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्याला ‘राजकारण’ म्हणत असतील, तर होय, आम्ही शेतकऱ्यांसाठी हे राजकारण करत आहोत,” असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. आंदोलनानंतर व्हीआयपी संस्कृतीला फाटा देत रोहित पवार यांनी चक्क ऑटो रिक्षाने प्रवास करत रामकुंड परिसर सोडला, ज्याची चर्चा दिवसभर सुरू होती.

ताज्या बातम्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार संवेदनशील; उद्या दिल्लीत बैठक – मुख्यमंत्री...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai कांदा दर घसरणी विरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असताना आज नाशिक मध्ये आ.रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी तर्फे कांदा...