पंचवटी |प्रतिनिधी | Panchvati
पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी “ॐ नमः शिवाय” आणि “बम बम भोले” च्या गजरात शहरातील आस्थेचे ठिकाण असलेल्या श्री कपालेश्वर महादेवाच्या मंदिरासह (temple of Kapaleshwar Mahadev) गोदाघाटावरील व परिसरात पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी उसळली. पावसाच्या विश्रांतीमुळे भाविकांच्या उत्साहाला उधाण आले असून, प्रशासनातर्फे सुरक्षेचे आणि गर्दीचे कडक नियोजन करण्यात आले.
कपालेश्वर मंदिरात पहाटे चार वाजता पुजारी अजित गर्गे आणि अनिल भगवान गुरव, आनंद करकमकर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक, जलाभिषेक आणि विशेष महापूजा करण्यात आली. दुपारी चार वाजता कपालेश्वराचा पंचमुखी मुखवटा मंदिरात आणून धार्मिक विधीवत पूजन करण्यात आले, त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पालखी मिरवणूक (Procession) काढण्यात आली. शिवभक्तांनी बेलपत्र, फुले, तांदूळ आणि धोतऱ्याचे फळ अर्पण करत दर्शन घेतले. पौराणिक कथेनुसार, महादेवाकडून ब्रह्महत्येचे पातक घडल्यानंतर नंदीनेच त्यांना या तीर्थक्षेत्री स्नानाचा मार्ग दाखवला होता.
नंदीने गुरुसमान मार्गदर्शन केल्याने महादेवाने नंदीला आपल्यासमोर न बसता गुरुस्थान दिले. त्यामुळे या मंदिरात महादेवाच्या समोर नंदीची मूर्ती नाही. -कपालेश्वरासोबतच गोदाघाटावरील बाणेश्वर, ताग्येश्वर, कर्पुरेश्वर, विश्वेश्वर, नीलकंठेश्वर, नारोशंकर, मुक्तेश्वर, तसेच तपोवनातील जनार्दन स्वामी आश्रम परिसरातील शर्वायेश्वर आणि महामृत्युंजय मंदिरात दिवसभर रांगा लागल्या होत्या. हिरावाडीतील बेलेश्वर, नांदूर येथील नीलकंठेश्वर, मानूर येथील शिवगंगा आणि आडगाव, मखमलाबाद, म्हसरुळ परिसरातील शिवमंदिरांतही भाविकांनी (Devotees) मोठी गर्दी केली होती.
सीसीटीव्हीची नजर
गर्दीचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी संस्थानतर्फे २५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा करण्यात आल्या असून मंदिराकडे जाणारे वाहतूक मार्ग बंद करण्यात आले आहेत.
मंदिरात येऊ न शकणाऱ्या भक्तांसाठी प्रशासनाने ऑनलाइन दर्शनाची सोय केली असून, दुपारी ३ वाजेपर्यंत ४,०५७ हून अधिक भाविकांनी या सुविधेचा लाभ घेतला.गर्दी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासन आणि भाविकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे.
विलास पाटील (मुख्य प्रशासक, कपालेश्वर मंदिर संस्थान)




