अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
वाकोडी (ता. अहिल्यानगर) येथे राहत्या घराजवळ एका व्यक्तीचा मारहाण करून खून करण्यात आल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. दिलीप करमदास भोसले (वय 42, रा. वाकोडी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी त्यांची दोन्ही मुले रोहित दिलीप भोसले (वय 21) आणि अंबर दिलीप भोसले (वय 19) यांना पोलिसांनी अटक केली आहे. वडील दारू पिऊन आईला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करत तसेच मुलांनाही त्रास देत असल्याने रागाच्या भरात दोघांनी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (24 ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास वाकोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ दिलीप भोसले यांना अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून ठार मारले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला संशयित आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस अंमलदार अतुल लोटके, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, भगवान धुळे यांचे पथक तयार केले. पथकाने घटनास्थळी भेट देऊन गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समांतर तपास सुरू केला.
तपासादरम्यान दिलीप भोसले यांच्या मुलांचा या खुनात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दिलीप भोसले हे दारू पिऊन पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करत असत. तसेच ते मुलांनाही त्रास देत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. कर्जबाजारीपणावरूनही घरात वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या पार्श्वभूमीवर रागाच्या भरात दोन्ही मुलांनी वडिलांचा खून केल्याचा संशय तपासातून पुढे आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर रोहित आणि अंबर भोसले यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.




