Thursday, June 4, 2026
HomeनगरRahata : गर्भलिंग चाचणी प्रकरणात आणखी तिघांना अटक

Rahata : गर्भलिंग चाचणी प्रकरणात आणखी तिघांना अटक

आरोपींची संख्या 16 वर; आरोपींमध्ये तब्बल 5 डॉक्टरांचा समावेश

राहाता/श्रीरामपूर |प्रतिनिधी| Rahata | Shrirampur

राहाता तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गर्भलिंग चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. या नव्या कारवाईमुळे या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 16 वर पोहोचली असून, त्यामध्ये तब्बल पाच डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

या प्रकरणात यापूर्वी तीन डॉक्टर, चार एजंट तसेच सहा गर्भवती महिलांच्या नातेवाईकांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात गर्भलिंग निदानासाठी वापरली जाणारी दोन बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन जप्त केली आहे. त्यातील एक मशीन नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील आरोपी डॉ. राहुल भणगे यांच्याकडून तर दुसरे मशीन अटक आरोपी रवींद्र ढगे याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे.

तपासादरम्यान ही दोन्ही मशीन कोणत्याही अधिकृत नोंदणीशिवाय बेकायदेशीररीत्या गर्भलिंग तपासणीसाठी वापरली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या मशीनचा वापर दीर्घकाळापासून सुरू असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशयही व्यक्त होत आहे.
पोलीस कोठडीत आरोपींकडे कसून चौकशी केल्यानंतर ही मशीन पुणे जिल्ह्यातील दोन डॉक्टर व एका व्यक्तीकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ पथके रवाना करून रात्री उशिरा तिघांना ताब्यात घेतले. यामध्ये डॉ. आकाश सुभाष मलगुंडे (शिरूर, जि. पुणे), डॉ. नीलकंठ अशोक जाधव (लोहगाव, जि. पुणे) आणि नरेंद्र साहेबराव ठाकरे (केसनंदगाव, हवेली) यांचा समावेश आहे.

तिन्ही आरोपींना लोणी पोलीस ठाण्यात आणून संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यांना राहाता न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. आता या आरोपींनी ही प्रतिबंधित मशीन नेमकी कुठून आणली, त्यामागे आणखी कोणते जाळे कार्यरत आहे का? तसेच अन्य डॉक्टर किंवा दलाल यांचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

राज्यात गर्भलिंग चाचणीवर कायद्याने कठोर बंदी असतानाही अशा प्रकारचे प्रकार सुरू असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित काही व्यक्ती आर्थिक फायद्यासाठी कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे चित्र या प्रकरणामुळे स्पष्ट झाले असून, सामाजिक स्तरावरही संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे करत आहेत. पोलिसांकडून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात एटीएसची छापेमारी; चौघांची चौकशी

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दाखल होत कारवाई केली, शहराच्या विविध भागांतील सात ते आठ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. सोशल मीडियाच्या...