श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध गर्भलिंग निदान चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी आणखी पुण्यातील एका डॉक्टरसह एका एजंटला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 21 वर पोहोचली असून त्यामध्ये तब्बल सात डॉक्टरांचा समावेश आहे. या प्रकरणात सुरुवातीला नेवासा येथील डॉ. भणगे, दोन एजंट आणि सहा कुटुंबीय अशा नऊ जणांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन व तीन चारचाकी वाहने जप्त केली होती. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी आरोपी ढगे याच्याकडून आणखी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त केले. तसेच अनेक एजंटांनाही अटक करण्यात आली.
तपासादरम्यान श्रीरामपूर येथील डॉ. कुटे व डॉ. शेख यांचा अवैध गर्भलिंग निदान चाचण्या आणि बेकायदेशीर गर्भपाताशी संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. पुढील चौकशीत पुण्यातील दोन डॉक्टर आणि वैद्यकीय साहित्य विक्री करणार्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर वडगाव मावळ येथील मारुती ढोरे यालाही आरोपी करण्यात आले असून त्याच्याकडून गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे मशीन जप्त करण्यात आले. तपास अतिशय बारकाईने आणि शास्त्रोक्त पद्धतीने सुरू असताना पुण्यातील अटक आरोपींकडून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एका डॉक्टरनेही बेकायदेशीररित्या सोनोग्राफी मशीन खरेदी केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी विशेष पथक रवाना केले.
या पथकाने निफाड येथील डॉ. कुणाल वलटे आणि तेथील मेडिकल चालक सागर उन्हाळ यांना ताब्यात घेऊन अटक केली. यानंतर तपासाची साखळी पुढे नेत पोलिसांनी घोगरगाव (ता. श्रीगोंदा) येथील मेडिकल चालक जालिंदर रामदास बोरुडे याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने अनेक गर्भवती महिलांच्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या झाल्याची माहिती दिली. तसेच या रॅकेटमध्ये एजंट म्हणून राम किसन पवार उर्फ तपोश शिबू सरकार (रा. मलठण, ता. कर्जत) कार्यरत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी तत्काळ पथक पाठवून राम किसन पवार याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून अवैध गर्भपातासाठी वापरण्यात येणार्या औषधांच्या गोळ्याही जप्त करण्यात आल्या. न्यायालयाने त्याला 16 जूनपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तपासात पुण्यातील आणखी एका डॉक्टरचा सहभाग उघड झाल्याने डॉ.अतुल अंकुश जाधव (रा.वाघोली, पुणे) यांनाही अटक करण्यात आली. तेही बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्यांमध्ये सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने त्यांनाही सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
या बहुचर्चित प्रकरणात आतापर्यंत 21 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सात डॉक्टर, तीन मेडिकल चालक आणि वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणारा एक मोठा पुरवठादार यांचा समावेश आहे. तसेच तपासादरम्यान पाच सोनोग्राफी मशीन, चार चारचाकी वाहने आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या या साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांकडून व्यापक तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.भारती तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.आठरे हे पुढील तपास करीत आहेत.




