नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार विभाग प्रमुख तथा सहसंशयित डॉ. स्वाती नकुल वंजारी उर्फ स्वाती शंकर चव्हाण हिच्या जामीन अर्जावर न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, न्यायालय उद्या (दि. ५) जामिनाबाबतचा निर्णय देणार आहे.
६ मार्च २०२६ रोजी डॉ. मनीषा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मनीषा यांची बहीण प्रा. रोहिणी थोरात (रा. हिरावाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपासात १८ सप्टेंबर रोजी पती डॉ. नीलेश जेजुरकर याला, तर २० सप्टेंबर रोजी सहसंशयित डॉ. स्वाती चव्हाण हिला अटक करण्यात आली. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर २१ सप्टेंबरपासून दोघेही नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. डॉ. स्वातीने २९ सप्टेंबर रोजी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तिच्या बाजूने अॅड. मृणाल भिडे यांनी युक्तिवाद केला.
शनिवारी (दि. ३) दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले असून न्यायालयाने निकालासाठी ५ ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. दुसऱ्या बाजूला, मुख्य संशयित पती डॉ. नीलेश जेजुरकर याने अद्याप जामिनासाठी अर्ज दाखल केलेला नाही, असे समजते. दोन्ही संशयितांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅटिंग आणि डिजिटल पुराव्यांचा फॉरेन्सिक तपास सुरू असून, फॉरेन्सिक विभागाचा हा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे. या डिजिटल पुराव्यांमुळे या प्रकरणातील गूढ उकलण्यास मदत होणार आहे. त्यामुळे उद्या सोमवारी न्यायालय डॉ. स्वाती वंजारी हिचा जामीन मंजूर करते की फेटाळते, याकडे नाशिककरांचे आणि वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष आहे.
उच्च न्यायालयाचे निरीक्षण
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे आणि सरकारी पक्षाच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे अत्यंत गंभीर आहेत. मनीषा यांचा मृत्यू केवळ आत्महत्येचा नसून ही हत्या असावी, असा दाट संशय वकिलांनी न्यायालयात व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालात फेरफार करण्यात आल्याचा आरोप न्यायालयात करण्यात आला आहे. ज्या खिडकीला दोरी बांधून आत्महत्या झाल्याचे दर्शवले गेले, त्यावरून ही हत्याच असल्याचा संशय उपस्थित झाला आहे. डॉ. स्वातीने मनीषा यांच्याशी साधलेला संवाद आणि ९ एप्रिल २०२६ रोजी एका महिला डॉक्टरने नोंदवलेल्या जबाबानुसार डॉ. नीलेश जेजुरकर याच्या विवाहबाह्य संबंधांवर उच्च न्यायालयाने पुष्टी केली हाेती.




