Friday, June 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्राचा लोकधर्म (भाग १)

महाराष्ट्राचा लोकधर्म (भाग १)

नंदन रहाणे

ज्येष्ठ पौर्णिमा झाली आहे. शुद्ध त्रयोदशीचा किल्ले रायगडावरचा शिवराज्यभिषेक सोहळाही संपन्न झाला आहे. आता महाराष्ट्राला वेध लागले आहेत ते पंढरपूरचे.

- Advertisement -

आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. त्या दिवशी देव झोपी जातात ते थेट कार्तिक शुद्ध एकादशीलाच जागे होतात अशी वैष्णव संप्रदायाची समजूत आहे पण देव झोपी गेले तरी भक्तांनी झोपेच्या अधीन व्हायचे नसते. उलट त्यांनी जागे राहून सहज विचारांचा जागर करीत सदभक्तीचे मळे फुलवायचे असतात असे वारकरी संप्रदाय मानतो! हा भक्तीपंथ महाराष्ट्राचा लोकधर्म ठरला आहे. तो संतांमुळे… आणि म्हणूनच वारंकरी मंडळी देवापेक्षाही अधिक नाम गजर करतात तो संतांचा… अशी अजब भक्ती करणारा, तो जगाच्या पाठीवरील एकमेव संप्रदाय असावा!

ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम हे 4 महासंत आणि त्यांचे सखे, सवंगडी, भाऊ, बहिणी, मुले असे आणखी 35-36जणांना या वारंकरी संप्रदायात संत म्हणून मान्यता आहे… या सुमारे 40 जणांपैकी प्रत्येकाने अभंगरचना केली आहे. म्हणजे ते भक्त तर आहेतच, पण कवीही आहेत. मात्र, संत होण्यासाठी तेवढे पुरेसे नसते. आपण जी तत्त्वे आणि मूल्ये यांचा उद्घोष करतो, त्यानुसार आचरण करण्यासाठी जे धडपडतात व निष्कलंकपणे तसे जे जन्मभर वागून दाखवतात, त्यांनाच संत म्हणतात! अन् ते स्वत:च स्वत:ला म्हणून भागत नाही, तर इतरांनी तसे म्हणावे लागते व मानावेही लागते!! वास्तवात, या स्वार्थाने लडबडलेल्या जगामध्ये ते किती अवघड आहे याची कल्पना प्रत्येकाला आहेतच!!!

तर अशा वारंकरी संप्रदायाची परंपरा नामदेवरायांपासून सुुरु होत आणि ती निळोबारायांपाशी पूर्ण होते. या सगळ्या संतांच्या पालख्या मागच्या व या आठवड्यात पंढरपूरकडे दरवर्षी प्रस्थान करतात. सर्वांत दुरची पालखी रुक्मिणीदेवींच्या कौंडिण्यपूरहुन निघते. श्रीकृष्णपत्नीचे ते माहेर अमरावती जिल्ह्यात आहे.

त्यानंतर मुक्ताबाईंची पालखी कोथळी येथून निवृत्तिनाथांची त्र्यंबकेश्वरहून, ज्ञानदेवांची आळंदीमधून, तुकोबांची देहूतून अशी मालिका सुरु होते. सर्वांत शेवटी चोखोबारायांची पालखी मंगळवेढ्यातून निघते. कारण पंढरपूर-मंगळवेढा हे अंतर फक्त 22 च किलोमीटर आहे. मजल दरमजल करीत या सर्व पालख्या आषाढ शुद्ध दशमीला वाखरी येथे पोचतात. मग पंढरपूरचे पदसिध्द स्वागताध्यक्ष पांडुरंगाचे प्रेमभांडारी संतशिरोमणी श्रीनामदेव महाराजांची पालखी पंढरपुरातून निघते आणि वाखरीला येते.

स्वत: नामदेवराय सर्व संतांचे स्वागत करतात व सर्व पालख्यांना आपल्या समवेत पंढरपूरमध्ये नेतात. त्यादिवशी संध्याकाळी वाखरी ते पंढरपूर या मार्गावर भक्तीसमुद्राला उधाण आलेले असते व 10 ते 12 लाख वारंकरी हजारो दिंड्यांच्या माध्यमातून पंढरीत प्रवेश करतात. सर्व पालख्यांचा मुक्काम तेथे आषाढ पौर्णिमेपर्यंत असतो. त्या दिवशी संतांच्या पादुकांच्या भेटी पांडुरंगाशी घडवल्या जातात, गोपाळपुर्‍यात काल्याचा सोहळा होतो. आणि मग संतांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला लागतात.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दारणातूनही विसर्ग वाढला, गोदावरी दुथडी

0
राहाता | Rahata नाशिक जिल्ह्यात सह्यद्रीच्या घाटमाथ्यावर दोन दिवसांपासून संततधार सुरु असून दारणा धरण निम्मे भरल्याने या धरणातून विसर्ग सुरु झाला आहे. तर आज शुक्रवारी...