शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण आता शिर्डीत पोहचले आहे. एव्हाना स्थानिक अधिकारी शांत असताना आता त्याच अधिकार्यांनी छापेमारी सुरू केल्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणार्या लाखो भाविकांच्या श्रद्धेशी आणि आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शिर्डी शहर व परिसरात प्रसाद म्हणून सर्रास विकल्या जाणार्या पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाच्या विशेष पथकाने शिर्डीत दाखल होत नमुने संकलन मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. या कारवाईमुळे शिर्डीतील भेसळखोर आणि नियमबाह्य व्यवसाय करणार्या प्रसाद विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
शिर्डीतील अनेक दुकानांमध्ये विकल्या जाणार्या पेढ्यांच्या बॉक्सवर उत्पादकाचे नाव, उत्पादनाची तारीख, बॅच नंबर तसेच मुदत समाप्तीची कोणतीही माहिती स्पष्टपणे नमूद केली जात नसल्याच्या तक्रारी भाविकांकडून सातत्याने येत होत्या. काही ठिकाणी तर पेढ्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर एफडीएच्या छापा पथकाने विविध दुकानांवर अचानक धाडी टाकून पेढ्यांचे नमूने गोळा केले आहेत. हे सर्व नमुने नियमानुसार सील करण्यात आले असून ते तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणार्या विक्रेत्यांवर थेट गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी दिली आहे.
पेढ्यांच्या या कारवाईनंतर आता शिर्डीतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि उपहारगृहांमध्ये वापरला जाणारा खवा, पनीर, दूध आणि तूप या दुग्धजन्य पदार्थांचीही सखोल तपासणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नव्हे तर, साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांना मिळणार्या अधिकृत लाडू प्रसादासाठी वापरल्या जाणार्या तुपाचा दर्जा देखील अन्न व औषध प्रशासनाने तपासून घ्यावा, अशी जोरदार चर्चा आता शिर्डीतील ग्रामस्थ आणि साईभक्तांमध्ये सुरू झाली आहे. शिर्डीची जागतिक ओळख आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यंत गरजेचे आहे. भाविकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने ही मोहीम केवळ पेढ्यांपुरती मर्यादित न ठेवता शहरातील संपूर्ण खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची व्यापक तपासणी करावी, अशी मागणी आता साईनगरीत जोर धरू लागली आहे.
दूध भेसळखोरही हादरले
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचा आपल्याला दणका बसू नये यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील दूध भेसळखोर सावध झाले असून काहींनी दूध भेसळ बंद केल्याची माहिती हाती आली आहे.




