मुंबई | Mumbai
कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे (Rajapur Assembly Constituency) तीनवेळा आमदार राहिलेले राजन साळवी (Rajan Salvi) २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. किरण सामंत यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. त्यामुळे एसीबीच्या रडारवर असलेले अन् विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले राजन साळवी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याची चर्चा होती. राजन साळवी हे भाजपचे कमळ हाती घेणार असल्याचे म्हटले जात होते. भाजपच्या (BJP) महाअधिवेशनात त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू होती. मात्र, राजन साळवी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मौन सोडत चर्चांना पूर्णविराम दिला.
यावेळी बोलतांना साळवी म्हणाले की, “ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख आहे. २०२४ च्या पराभावाला आम्ही सामोरे गेलो आहोत. पराभवाचं दुःख, खंत आणि वेदना माझ्यासकट माझ्या मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे. पराभवाची खंत असताना भविष्याकडेही शिवसेना (Shivsena) मार्गक्रमण करत आहे. तुमच्या माध्यमातून मला समजतं आहे की मी नाराज आहे. भाजपा किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसं काही नाही. माझ्या रोजच्या कामात माझं मार्गक्रमण सुरू आहे. अशातऱ्हेच्या बातम्या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार. यात कोणतीही शंका नाही”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “पिकल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारणार. तसाच काहीसा प्रयत्न भाजप किंवा अन्य लोकांचा असू शकतो. पण माझ्याशी कोणीही संपर्क केलेला नाही. पक्षात येणाऱ्या माणसाचं स्वागत करणं प्रत्येक पक्षप्रमुखाचं कर्तव्य असतं. पण मतदारसंघात आणि जिल्ह्यात माझ्या संघटनकौशल्यामुळे मी यावं असं वाटत असेल. त्यामुळे त्यांची अपेक्षा असेल.मात्र, मी सध्या माझ्या मतदारसंघात कामं करत असून लोकांमध्ये आहे. मतदारसंघात काम करत असताना मी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचे” साळवी यांनी म्हटले.
‘तो’ उल्लेख करताच राजन साळवी चिडले
पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ‘उबाठा’ असा उल्लेख केल्याने माजी आमदार राजन साळवी चिडल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं सुंदर नाव दिलं आहे. या ज्या काही चर्चा सुरू आहेत त्याबाबत पदाधिकारी, मतदार माझ्याशी संपर्क करतील, चर्चा करतील आणि त्या दिवशी मी नक्कीच भविष्यात मार्गक्रमण करेल, असे सांगताना पक्ष सोडण्याच्या सगळ्या अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वरिष्ठांनी निवडणूक झाल्यानंतर संपर्क केला का?
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षश्रेष्ठीने संपर्क साधला नसल्याने राजन साळवी नाराज असल्याची चर्चा होती. पंरतु, आजच्या पत्रकार परिषदेत साळवी यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले की, “पराभवानंतर मुंबईतील मातोश्री येथे पराभूत उमेदवारांची बैठक घेतली होती. तिथे पराभवाचे कारण आणि आत्मचिंतन करण्यात आले. तेच आमच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे”, असे त्यांनी सांगितले.