Saturday, November 23, 2024
HomeनगरBhanudas Murkute : भानुदास मुरकुटे अडचणीत! राहुरी पोलिसांनी मध्यरात्री केली अटक, प्रकरण...

Bhanudas Murkute : भानुदास मुरकुटे अडचणीत! राहुरी पोलिसांनी मध्यरात्री केली अटक, प्रकरण काय?

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास काशिनाथ मुरकुटे यांनी अनेक आमिषे दाखवून महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राहुरी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मुरकुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी मध्यरात्री राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या श्रीरामपूर येथील निवासस्थानावरुन अटक केली. काल राहुरी न्यायालयात हजर केले असता त्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

- Advertisement -

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, मी तुला बंगला घेऊन देतो, तुझ्या मुलाला नोकरी मिळवून देतो, शेती घेऊन देतो अशी विविध प्रकारची आमिषे दाखवून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पाथरे, श्रीरामपूर, मुंबई, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेले. तेथे गेल्यावर मादक पदार्थ देऊन अत्याचार केले. ही घटना 2019 ते 2023 यादरम्यान घडली असून मुंबई, श्रीरामपूर, दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि अन्य वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आयपीसी 376 (2) एन 328, 418, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मोठी गोपनियता पाळून राहुरी पोलिस सोमवारी रात्री फौजफाट्यासह श्री. मुरकुटे यांच्या श्रीरामपुरातील निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांना आपणास चौकशीसाठी राहुरी ठाण्यात यावे लागेल असे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र प्रतिष्ठीत व्यक्तीला अटक करताना अटक वॉरंट लागते त्यामुळे ते दाखवा असे श्री. मुरकुटे यांचे वकील म्हणाले. मात्र विशिष्ट गुन्ह्यांमध्ये अटक वॉरंटची गरज नसल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. सुमारे तासभर यावर चर्चा झाल्यानंतर श्री. मुरकुटे राहुरी पोलिस ठाण्यात जाण्यास तयार झाले. राहुरी पोलिस ठाण्यात गेल्यावर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुरकुटे यांनी रक्तदाब वाढल्याची तक्रार केल्याने त्यांना रात्रीच उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काल दुपारी तीन वाजता मुरकुटे यांना राहुरी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाकडून तपासासाठी आरोपीची 5 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. मात्र, बचाव पक्षाच्यावतीने आरोपीचे वय व वैद्यकीय कारणे दिल्याने न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून मुरकुटे यांना दोन दिवसांची (दि.10 ऑक्टोबर पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दुपारी साडेतीन वाजता सुरु झालेले न्यायालयाचे कामकाज तब्बल सहा तासानंतर म्हणजे रात्री साडेनऊ वाजता संपले.

भानुदास मुरकुटे यांच्यावतीने अ‍ॅड. महेश तवले, अ‍ॅड. सुमित पाटील अ‍ॅड.सुभाष चौधरी, अ‍ॅड.उमेश लटमाळे, अ‍ॅड. ऋषिकेश बोर्डे, अ‍ॅड. महेंद्र आढाव, अ‍ॅड.राहुल बारस्कर आदींनी काम पाहिले. तसेच औरंगाबाद खंडपीठाचे विधीज्ञ राहुल करपे हे उपस्थित होते. सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी अभियोक्त अ‍ॅड. सविता गांधले, श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक डॉ. बसवराज शिवपुजे व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी बाजू मांडली. घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पोलिसांना दाखविले व्हिडीओ व फोटो
पीडित महिलेने सोमवारी रात्री 10 वाजेदरम्यान राहुरी पोलीस ठाणे गाठत केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ व फोटो पुरावे म्हणून दाखवल्याने भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले. रात्री व काल दुपारी मुरकुटे समर्थकांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये व न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या