दिल्ली । Delhi
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता आम आदमी पार्टीने (AAP) केंद्र सरकारच्या २० टक्के एथेनॉल मिश्रित इंधन (E20 Fuel) धोरणाविरोधात थेट मोर्चा उघडला आहे. सरकारने हे धोरण तात्काळ मागे न घेतल्यास देशव्यापी आंदोलन उभारण्याचा थेट इशारा ‘आप’ने दिला असून, पुढील आठवड्यात थेट पंतप्रधान निवासस्थानावर याचिका घेऊन जाण्याची आक्रमक रणनीती आखण्यात आली आहे.
‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर (ट्विटर) पोस्ट करत देशवासीयांना आणि विशेषतः तरुणाईला या लढ्यात उतरण्याचे जाहीर आवाहन केले आहे. “देशातील तरुणांनी एकत्र येऊन बुलंद आवाज उठवला, म्हणूनच धर्मेंद्र प्रधान यांना शेवटी राजीनामा द्यावा लागला. आता E20 इंधनाच्या जनविरोधी मुद्द्यावरही आपल्याला अशाच प्रकारे एकजुटीने लढा उभारावा लागेल,” असे केजरीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
E20 धोरणाविरोधात सर्वसामान्य नागरिक, विशेषतः वाहनधारकांची मते जाणून घेण्यासाठी ‘आप’कडून येत्या शनिवारी एका विशेष ‘नॅशनल टाउनहॉल अगेंस्ट E20’ चे आयोजन करण्यात आले आहे. E20 इंधनामुळे वाहनांचे होणारे नुकसान आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार यावर या टाउनहॉलमध्ये थेट चर्चा केली जाईल. या कार्यक्रमात देशभरातून नागरिक प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने सहभागी होऊ शकतात. यासाठी पक्षाने एक विशेष मोबाईल नंबर देखील जारी केला आहे. “देशातील जनतेचा हा आवाज शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकावाच लागेल,” असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर बॅकफूटवर आलेल्या केंद्र सरकारला आता E20 इंधनाच्या मुद्द्यावरून घेरण्याची पूर्ण तयारी ‘आप’ने केली आहे. वाहनांच्या इंजिनवर होणारा परिणाम आणि इंधनाचा मायलेज घटत असल्याच्या तक्रारी सामान्य वाहनधारकांकडून आधीच समोर येत आहेत. अशा परिस्थितीत ‘आप’ने या मुद्द्याला थेट जनतेच्या खिशाशी जोडून राजकीय रंग दिला आहे. आता येत्या शनिवारी होणाऱ्या टाउनहॉलला आणि पुढील आठवड्यातील पंतप्रधान निवासावरील मोर्चाला जनता कसा प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




