नवी दिल्ली | New Delhi
देशाला जागतिकीकरणाच्या वाटेवर नेणारे आणि नव्या आर्थिक विकासाची देशात सुरुवात करणारे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांचे गुरुवार (दि.२६ डिसेंबर) रोजी दिल्लीतील एम्समध्ये ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर आज शनिवार (दि.२८ डिसेंबर) रोजी दिल्लीतील निगमबोध घाटावर डॉ.मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. डॉ.मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
दोन वेळा पंतप्रधान राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांना भारतात (India) केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे आदराचे स्थान होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे. डॉ. मनमोहन सिंग यांना तिन्ही दलाकडून सुरुवातीला अखरेची सलामी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी अनेक केंद्रीय मंत्री व सर्वपक्षीय नेते देखील उपस्थित होते.
दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांना डॉ. मनमोहन सिंग यांचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी त्यांचे पार्थिव सकाळी आठ ते नऊ वाजेच्या सुमारास काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी काँग्रेसच्या मुख्य नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघाली व काही वेळातच निगमबोध घाटावर पोहोचली. यानंतर त्याठिकाणी उपस्थितांनी डॉ.सिंग यांना मानवंदना अर्पण केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.