Sunday, June 14, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीत 200 रुपयांचा गजरा विकला 2 हजाराला

Shirdi : शिर्डीत 200 रुपयांचा गजरा विकला 2 हजाराला

श्रद्धेच्या नावाखाली भाविकांची लूट || विक्रेत्यावर गुन्हा दाखल

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबांच्या पावन नगरीत भाविकांची लूट थांबण्याचे नाव घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबईतील एका भाविकाला 200 रुपयांचा मोगर्‍याचा गजरा तब्बल 2000 रुपयांना विकून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शिर्डीत येणार्‍या साईभक्तांच्या फसवणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथील भाविक जयेंद्र लाभशंकर मेहता हे साईदर्शनासाठी आले होते. द्वारकामाई परिसरात संजय देशमुख या गजरा विक्रेत्याने पहिली माळ तुमचीच जाईल असे सांगून त्यांना भावनिक साद घालत गजरा घेण्यास भाग पाडले. सुरुवातीला किंमत न सांगता नंतर थेट दहापट म्हणजेच 2000 रुपयांची मागणी केली. पैसे देण्यासाठी विक्रेत्याने भाविकाला वारंवार फोन करून त्रास दिल्याने अखेर मेहता यांनी साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागाकडे लेखी तक्रार केली. यानंतरपोलिसांनी संबंधित विक्रेत्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या विक्रेत्यावर यापूर्वीही तक्रारी होऊनही ठोस कारवाई न झाल्याने त्याचे मनोबल वाढल्याचे बोलले जात आहे.

शिर्डीत केवळ हार फुलांच्या बाबतीतच नव्हे, तर प्रसाद आणि पेढ्यांच्या विक्रीतही मोठा गोरखधंदा सुरू असल्याचे आरोप होत आहेत. प्रसादाच्या गुणवत्तेवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. साई संस्थान, नगरपालिका आणि अन्न व औषध प्रशासन या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना भाविकांमध्ये तीव्र आहे. श्रद्धेपोटी येणार्‍या भक्तांची अशी लूट शिर्डीची प्रतिमा मलीन करत असून, अशा लुटारूंवर केवळ औपचारिक कारवाई न करता कायमस्वरूपी कठोर जरब बसवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

शिर्डीत अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी कागदोपत्रीच उरल्याचे चित्र आहे. प्रसाद आणि पेढ्यांच्या दर्जाची नियमित तपासणी होत नसल्याने भेसळयुक्त पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे. भाविकांच्या जिवाशी होणारा हा खेळ थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलणे गरजेचे आहे. केवळ एखादा गुन्हा दाखल करून ही समस्या सुटणार नाही, तर प्रशासनाने निरंतर देखरेख ठेवणे आवश्यक आहे.

साईप्रसादाच्या नावाखाली शिर्डीत पेढा व प्रसाद सर्रास विकला जातो, परंतु त्याची गुणवत्ता अन्न व औषध प्रशासनाकडून तपासली जाते का, हा मोठा प्रश्न आहे. नगरपालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. फूल-प्रसाद विक्रीत भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी नियमित भरारी पथके तैनात करावीत आणि चुकीचे काम करणार्‍यांना कडक धडा शिकवावा.
– कैलासबापू कोते (माजी नगराध्यक्ष, शिर्डी)

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...