मुंबई । Mumbai
शिरूर तालुक्यातील बोऱ्हाडेमळा परिसरात एका गंभीर अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका आमदाराच्या भरधाव मर्सिडीज कारने (Mercedes Car) चार वर्षांच्या चिमुकलीला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शनिवारी दुपारी हा अपघात झाला. या अपघातात चिमुकली गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) देखील समोर आले आहे. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रस्ता ओलांडत असताना वाघोलीहून शिरूरकडे येत असलेल्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज (क्रमांक MH 12 1391) कारने त्या चिमुकलीला जोराची धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, चिमुकली अक्षरशः चेंडूसारखी हवेत उडून काही फुटांवर जाऊन रस्त्यावर आदळली. हा अपघात किती गंभीर होता, याची कल्पना यावरून येते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात चिमुकलीचे दात पडले आहेत, तसेच तिच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या चेहऱ्यावरही खोल जखमा झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी कोणतीही वेळ न घालवता तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यांनी मुलीला ताबडतोब शिरूर येथील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, मुलीची गंभीर अवस्था पाहता तिला पुढील उपचारांसाठी तातडीने पुणे येथील केएम हॉस्पिटलमध्ये (KM Hospital) हलवण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, तिची परिस्थिती नाजूक असल्याची माहिती समोर येत आहे.
आमदाराच्या गाडीने चिमुकलीला धडक दिल्याच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक नियमांचे आणि वेगमर्यादेचे उल्लंघन किती धोकादायक ठरू शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.




