कोल्हार (वार्ताहर)
एक महिन्याच्या कालावधीमध्ये कोल्हार बुद्रुक येथील नवीन बांधकाम होत असलेल्या साठवण तलावाच्या ठिकाणी एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद झाले. एकाच महिन्यामध्ये एकाच जागेवर एकापाठोपाठ चार बिबटे पिंजऱ्यात अडकण्याची कदाचित ही पहिलीच घटना असावी. काल बुधवारी पहाटेच्या सुमारास मादी जातीचा साधारणतः अडीच वर्षे वयाचा बिबटया पिंजऱ्यात पकडला असून येथे पुन्हा पिंजरा लावण्यात आला आहे.
कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर या दोन्ही गावांच्या संयुक्तरित्या साठवण तलावाचे नवीन बांधकाम सुरू आहे. या भागात गेल्या एक – दोन महिन्यांपासून बिबट्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात संचार वाढला आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये या एकाच भागात एकापाठोपाठ चार बिबटे पिंजऱ्यात अडकले आहेत. या भागात आजूबाजूला सर्व शेतीचे क्षेत्र आहे. ऊस, फळबागा आदी पिकांचे क्षेत्र असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा आहे. येथील स्थानिक रहिवाशी शेतकऱ्यांना अनेकदा बिबट्याचे दर्शन घडत असते. बिबट्याच्या येथील वास्तव्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जीवाच्या भीतीने शेतीकामे करणे मुश्किल झाले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अशक्य बनले आहे.
वरील पार्श्वभूमीवर या भागात वन विभागाकडून पिंजरा लावण्यात येतो आणि त्याला यश देखील येत आहे. साधारणतः आठवडाभराच्या किंबहुना पंधरवड्याच्या अंतराने या एकाच ठिकाणी पिंजऱ्यात बिबटे अडकत आहेत. काल बुधवारी पहाटे पिंजऱ्यात जेरबंद झालेला चौथा बिबट्या आहे. मादी जातीचा अडीच वर्षे वयाचा हा बिबट्या पिंजरात अडकल्यानंतर वनविभागाला काल बुधवारी सकाळी कळविण्यात आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर पिंजरा येथून नेला असून या बिबट्याला माळशेजच्या जंगलात सोडण्यात येईल अशी माहिती वनरक्षक प्रतीक गजेवार यांनी दिली. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी काल बघ्यांची येथे मोठी गर्दी जमली होती. या परिसरात अजूनही बिबट्याचे वास्तव्य असल्याने येथे तात्काळ दुसरा पिंजरा उभा करण्यात आला आहे.
अंगावर झडप घालू पाहणारा बिबट्या…
अवघ्या दोन – तीन दिवसापूर्वी येथे सुरेश खर्डे शेतात ट्रॅक्टरवर जमिनीची नांगरट करत होते. सायंकाळी साडेसहा वाजेची वेळ होती. अशातच एक बिबट्या त्यांच्या ट्रॅक्टरसमोर येऊन डरकाळ्या फोडू लागला. सदर बिबट्या अंगावर झडप घालण्याच्या तयारीत होता. अंगाचा थरकाप उडविणारी ही वेळ होती. सुरेश खर्डे यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोबाईलवरून संपर्क करून बोलावले. त्यानंतर सर्वांनी मिळून त्या बिबट्याला पिटाळून लावल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दैनिक सार्वमतशी बोलताना दिली.