
मुंबई | प्रतिनिधी Nashik
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी मंगळवार २ जून रोजी महाविकास आघाडीतर्फे आणखी एक मोर्चा काढला जाणार आहे. सकाळी ९.३० वाजता पुणे-नाशिक महामार्गावरील नंदी महाराज चौक, तांबडेवळण (भोरवाडी) येथे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आघाडीने केले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे, नीलेश लंके, आमदार बाबाजी काळे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
कांद्याला प्रति किलो २५ रुपये हमीभाव, यापूर्वी खरेदी केलेल्या कांद्याला १५ ते २० रुपये प्रति किलो अनुदान तसेच नाफेडमार्फत मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करावी, अशी आघाडीची मागणी आहे. याशिवाय खरेदी केलेल्या कांद्यावरील निर्यातबंदी हटवून निर्यातीला परवानगी देण्याचीही मागणी आघाडीने केली आहे.
यापूर्वी १८ मे रोजी लासलगाव आणि २६ मे रोजी चांदवड येथे झालेल्या आंदोलनानंतर सरकारने काही प्रमाणात सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा आघाडीने केला आहे. आंदोलनाच्या दबावामुळे कांद्याच्या हमीभावात वाढ करण्याची घोषणा तसेच कांदा खरेदीचे प्रमाण वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याने आता विराट मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.




