Tuesday, October 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजएनसीएमसी स्मार्ट कार्ड साठी मुदतवाढ

एनसीएमसी स्मार्ट कार्ड साठी मुदतवाढ

ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

- Advertisement -

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत देण्यात येते. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी १ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली तरी काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे केवळ कार्ड उपलब्ध न झाल्याने पात्र प्रवाशांना शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागू नये, याची दखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे.

“एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशाची गैरसोय होऊ नये, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. या मुदतवाढीमुळे एनसीएमसी स्मार्ट कार्ड अद्याप प्राप्त न झालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पात्र प्रवाशांनी या वाढीव मुदतीचा उपयोग करून एनसीएमसी स्मार्ट कार्डची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2747 गोण्यांची आवक...