Wednesday, December 4, 2024
Homeनगररस्ते अडवून मंडप उभारणार्‍या गणेश मंडळांना पोलिसांचा दणका

रस्ते अडवून मंडप उभारणार्‍या गणेश मंडळांना पोलिसांचा दणका

मंडप हटवण्याचे आदेश || वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून तपासणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहराच्या मध्यवर्ती भागातील व बस स्थानकाजवळील गजबजलेल्या परिसरात स्वस्तिक चौक येथे एका बाजूचा रस्ता पूर्ण बंद करून मंडप उभारण्यात आले होते. त्या दोन गणेश मंडळांचे मंडप हटवण्याचे आदेश पोलीस अधिकार्‍यांनी दिले आहेत. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अमोल भारती, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथकासह स्वस्तिक चौकात शनिवारी सायंकाळी पाहणी करून रस्ता पूर्ण बंद करून उभारण्यात आलेले मंडप हटविण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

स्वस्तिक चौकातून आनंद धामकडे जाणार्‍या रस्त्यावर व टिळक रोडकडून येणार्‍या रस्त्यावर राजकीय नेते व पदाधिकार्‍यांनी मंडप उभारले आहेत. महापालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता, वाहतूक शाखा, पोलीस खात्याची एनओसी न घेता रस्त्याचा एक भाग पूर्णपणे बंद करून हे मंडप उभारण्यात आले आहेत. अपर अधीक्षक खैरे व उपअधीक्षक भारती यांनी स्वतः जागेवर जाऊन संबंधितांना मंडप काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रस्ता अडवून मंडप उभारताना चाप बसला आहे. शहरात अशाच पध्दतीने कोणत्या मंडळाने मंडप उभारले असेल तर त्यांनी ते काढून घ्यावेत, अन्यथा कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, रस्त्यावर अनधिकृतपणे उभारलेल्या मंडपावर आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करावी, असे पत्र कोतवालीचे निरीक्षक दराडे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना दिले आहे. जनजागृती तरुण मंडळ स्वस्तिक चौक व राजयोग तरुण मंडळ यांनी रस्त्यावर मंडप उभारलेले असल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे. तरी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी अनधिकृतपणे उभारलेल्या मंडपावर आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई होण्याची विनंती निरीक्षक दराडे यांनी पत्राव्दारे आयुक्तांना केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या