नाशिक | Nashik
अनंत चतुर्दशीनिमित्त आज (शनिवारी) सकाळी ११ वाजता भद्रकालीतील (Bhadrakali) वाकडी बारव येथून मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला (Ganesh Immersion Procession) सुरुवात झाली आहे. लेझीम आणि ढोल ताशांसह पुष्पवर्षावात विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. या विसर्जनासाठी तीन हजार पोलिसांचा फौजफाटा मध्यरात्री दीड वाजेपर्यंत तैनात राहणार आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात (City) सर्व पोलीस ठाणे, विविध विभाग आणि पथकांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तर, ग्रामीण पोलिसांनी (Police) खबरदारी घेतली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुकीत राजकीय शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी विशेष खबरदारी घेत मिरवणूक मार्गासह मंडळांसमवेत बंदोबस्त नेमला आहे. यासह गणेशमूर्ती विसर्जन स्थळे, मुख्य व उपनगरातील मिरवणुकांच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात आहे.
तसेच मूर्तिदान व परिस्थितीचे अपडेट प्रत्येक तासाने नियंत्रण कक्षात कळविण्यात येत आहेत. बंदोबस्तासाठी पोलीस उपायुक्त ४, सहाय्यक आयुक्त -६, पोलीस निरीक्षक ४७, सहाय्यक ते उपनिरीक्षक १३०, परिविक्षाधीन उपनिरीक्षक ३७, अंमलदार २,२००, महिला अंमलदार ४००, होमगार्ड पुरुष १,१००, होमगार्ड महिला २५०, दंगल नियंत्रण पथक २ तुकड्या, राज्य राखीव पोलीस दल १ तुकडी, बॉम्ब शोधक व नाशक पथक २ तुकड्या कार्यरत आहेत.
असा आहे मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग
भद्रकाली येथील वाकडी बारव येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला असून, तेथून महात्मा फुले मंडई, शहीद अब्दुल हमीद चौक, बादशाही कॉर्नरमार्गे संत गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉईंट, सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजामार्गे मालेगाव स्टैंडकडून मिरवणूक गोदाकाठी पोहोचणार आहे.
मुख्य विसर्जन मिरवणुकीत क्रमानुसार सहभागी मंडळे
नाशिक महापालिका, रविवार कारंजा मित्रमंडळ (चांदीचा गणपती), गुलालवाडी व्यायामशाळा, भद्रकाली कारंजा मित्रमंडळ (साक्षी गणेश), श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ पेठ रोड, सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळ (नाशिकचा राजा), सरदार चौक मित्रमंडळ, रोकडोबा मित्रमंडळ, शिवसेवा मित्रमंडळ, शिवमुद्रा मित्रमंडळ (मानाचा राजा), युवक मित्रमंडळ, दंडे हनुमान मित्रमंडळ, युनायटेड फ्रेंड सर्कल, शनैश्वर युवक समिती चौक मंडई, नेहरू चौक मित्रमंडळ पिंपळपार, वेलकम सहकार्य मित्रमंडळ, गणेश मूकबधिर मित्रमंडळ, गजानन मित्रमंडळ, महालक्ष्मी चाळ सोशल फाऊंडेशन, बुरूड गल्ली लोकप्रिय मित्र मंडळ, भोई मित्र मंडळ कथडा, नवक्रांति मित्र मंडळ काठेगल्ली, अंबिका मित्र मंडळ पंचवटी, विनयनगर मित्र मंडळ, तिळभांडेश्वर मित्र मंडळ हे मिरवणुकीत सहभागी आहेत.
गिरीश महाजन यांच्या हस्ते आरती
मुख्य विसर्जन मिरवणुकीची सुरुवात वाकडी बारव, फाळके रोड येथून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मानाच्या महापालिकेच्या गणपतीची आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी मानाचे पाचही गणपती महापालिकेचा गणपती, रविवार कारंजा मित्रमंडळाचा चांदीचा गणपती, गुलालवाडी व्यायामशाळा मित्रमंडळाचा तिसरा गणपती, साक्षी गणेश (मानाचा चौथा) श्रीमान सत्यवादी मित्रमंडळाचा पाचवा गणपती एकामागून एक मार्गस्थ झाले.





