मुंबई | Mumbai
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ म्हणत महाराष्ट्रातील प्रत्येक घरोघरी, सरकारी कार्यालये आणि गावोगावी ढोल-ताशांच्या नादात आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पाचे (Ganpati Bappa) थाटात आगमन होत आहे. त्यामुळे राज्यातील भाविक (Devootes) भक्ती भावात न्हाऊन निघाले आहेत.
आज (बुधवारी) गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) पहिला दिवस असल्याने उत्सवमूर्ती थाटात त्यांच्या स्थापना ठिकाणी पोहचत आहेत. गणपती बाप्प्याच्या आगमनाने महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रत्येक घरांत मंगलमय वातावरण पसरले असून प्रत्येक ठिकाणी आनंद, भक्ती आणि उत्साह यांचा संगम बघायला मिळत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात रस्ते, गल्लीबोळ आणि सोसायट्या दुमदुमून गेल्या आहेत.
मुंबईतील (Mumbai) लालबाग, गिरगाव, दादर, परळ या भागांतील मंडळांनी आपापल्या बाप्पांची भव्य मखरे सजवली आहेत. प्रत्येक मंडळाने थाटामाटात गणरायाचे स्वागत केले असून, काही मंडळांनी सामाजिक संदेश देणाऱ्या सजावटी देखील केल्या आहेत. दुसरीकडे राज्यातील प्रत्येक फुल बाजारात पहाटेपासूनच भाविकांची झेंडूची फुले, कमळ, अशोकाची पाने यांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी उसळल्याचे दिसत आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त, सोशल मीडियावर करडी नजर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ठिकठिकाणच्या गणेश मंडळाबाहेर पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांकडून सोशल मीडियावर करडी नजर ठेवली जात असून, आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर पोलीस फिर्यादी होऊन गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच एखादी आक्षेपार्ह पोस्ट एखाद्या व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल होऊन त्यावर चॅटिंग झाल्यास व्हाट्सअप एडमिनवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गणेशोत्सवाच्या काळात सोशल मीडिया वापराताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





