अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश बन्सीलाल घायवळ याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढून विदेशात पलायन केल्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणामुळे पासपोर्ट विभागासह पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, घायवळने पासपोर्टसाठी अर्ज करताना अहिल्यानगर शहरातील पत्ता नमूद केला होता. त्यामुळे बुधवारी (1 ऑक्टोबर) कोथरूड (पुणे) पोलिसांचे पथक अहिल्यानगरमध्ये दाखल झाले होते. मात्र तपासात, दिलेल्या पत्त्यावर घायवळ किंवा त्याचे नातेवाईक राहत नसल्याचे स्पष्ट झाले. याबाबत कोतवाली पोलिसांकडे नोंद करण्यात आली आहे.
नीलेश घायवळ हा पुण्यातील अत्यंत कुख्यात गुंड असून त्याच्या टोळीने काही दिवसांपूर्वीच एका तरूणावर गोळीबार केला होता. त्यानंतर केवळ दहा मिनिटांतच दुसर्या तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या घटनेमुळे घायवळ टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली होती. घायवळविरूध्द खून, दरोडा, मारामारी, खंडणीसारखे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे पुणे जिल्ह्यात नोंद आहेत. एवढेच नव्हे तर त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे पोलीस त्याच्या मागावर होते.
मात्र दरम्यान, त्याने परदेशात पलायन केल्याचे समोर आले. घायवळच्या पासपोर्टवर आनंदी बाजार, गौरी घुमट, अहिल्यानगर असा पत्ता नोंदवलेला होता. त्याची पडताळणी करण्यासाठी कोथरूड पोलिसांचे एक पथक बुधवारी सकाळी अहिल्यानगरमध्ये दाखल झाले. कोतवाली पोलिसांच्या मदतीने त्यांनी आनंदी बाजार व गौरी घुमट परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र दिलेल्या पत्त्यावर इतर लोक राहत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, नीलेश घायवळ हा जामखेड तालुक्यातील सोनेगाव गावचा रहिवासी असून ते खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे अहिल्यानगरमधील चौकशी पूर्ण झाल्यानंतर कोथरूड पोलिसांचे पथक बुधवारी सायंकाळी जामखेडकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.




