Friday, May 3, 2024
Homeनगरखाणपट्टा नसताना लागले गौण खनिजाचे ढीग

खाणपट्टा नसताना लागले गौण खनिजाचे ढीग

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील बहुतांशी वन जमिनीवर अगोदरच माळढोक आरक्षण असल्याने गौण खनिज उत्खनन करण्यास परवानगी मिळत नव्हती.

- Advertisement -

यावर उपाय म्हणून महसूल विभागाकडून खाण पट्टा मंजूर करून दगड खाणी करून काही ठिकाणी स्टोन क्रेशर सुरू करण्यात आले आहेत. मात्र बहुतांशी ठिकाणी विनापरवाना दगड खाण आणि स्टोन क्रेशर सुरू असताना महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले असून तालुक्यातील येवती या गावात अशाच प्रकारे खाणपट्टा नसताना दगड खाण आणि स्टोन क्रेशर सुरू आहेत. विशेष म्हणजे महसूल विभागाकडे याबाबत एक रुपयांचीही (रॉयल्टी) स्वामीत्वधन भरलेले नाही.

तालुक्यातील खाजगी जमिनीवरील माळढोक क्षेत्र घटवण्यात आले असल्याने अनेक कामे करणे सोपे झाले असले तरी अनेक जण एखादा उद्योग करण्यासाठी ज्या परवानग्या आवश्यक असतात त्या घेण्याचे टाळत असतात. अशाचप्रकारे तालुक्यातील अनेक उद्योग हे सुरू असून यात सर्वाधिक विषय महसूल विभागाच्या अखत्यारीत येत आहेत.

यात विनापरवाना वीटभट्टीसाठी माती उचलणे, अवैध वाळूचा उपसा, रॉयल्टी न भरता मुरूम उत्खनन असे प्रकार सुरू आहेत. गाव पातळीवर असे विनापरवाना काम सुरू असेल तर तलाठी आणि मंडलाधिकारी यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असून पुढे तहसीलदारांना याबाबत माहिती देणे गरजेचे असताना अशी माहिती पुढे दिली जात नाही.

येवती या गावात कुठल्याही प्रकारची खाणपट्ट्याची परवानगी नसताना स्टोन क्रेशर सुरू आहे. विशेष म्हणजे स्टोन क्रेशरच्या परवानग्या पूर्ण केल्या असल्याचे सांगितले. मात्र यासाठी दगड खाणी मात्र विनापरवाना सुरू आहेत.हजारो ब्रास खडी आणि इतर साहित्य तयार करण्यात आले आहे. याबाबत गावकर्‍यांनी वारंवार तक्रार केली. मात्र बरेच दिवस प्रभारीराज होते. आता नवीन तहसीलदार यांनी चार्ज घेतला असल्याने आता तरी कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

कुकडी पाटबंधारे च्या नावाने पावत्या उत्खनन मात्र दुसरीकडे कुकडी डाव्या कालव्याच्या खोदकाम काही वर्षांपूर्वी झाले आहे.या खोदकाम मध्ये निघालेल्या दगड धोंडे हे स्टोन क्रेशरसाठी वापरतो, असे दाखवत इतर ठिकाणी उत्खनन केले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या