Tuesday, May 7, 2024
Homeब्लॉगसामुहिक विठ्ठल नामजपामुळे अध्यात्मिक ऊर्जेची निर्मिती

सामुहिक विठ्ठल नामजपामुळे अध्यात्मिक ऊर्जेची निर्मिती

भाारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. त्याच प्रमाणे सनातन हिंदू धर्म हा देखील सर्वांना सामावून घेत विश्वबंधुत्वाची साक्ष देणारा व साद घालणारा आहे. आपण या हिंदुस्थानच्या पवित्र भूमीत जन्म घेतला हे आपले भाग्य असून आपल्या थोर संस्कृतीची जपवणूक करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. मनुष्य देह हा देवाचे भजन करण्यासाठीच प्राप्त झाला आहे. म्हणून मनुष्याने इतर रंगात रंगण्याऐवजी ज्याने या विश्वातच रंग निर्माण केले अशा ईश्वराच्या रंगात रंगून जावे. त्यामुळेच संत तुकोबाराय देवापाशी हेच मागणे मागत आहेत.

भाारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. त्याच प्रमाणे सनातन हिंदू धर्म हा देखील सर्वांना सामावून घेत विश्वबंधुत्वाची साक्ष देणारा व साद घालणारा आहे. आपण या हिंदुस्थानच्या पवित्र भूमीत जन्म घेतला हे आपले भाग्य असून आपल्या थोर संस्कृतीची जपवणूक करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. मनुष्य देह हा देवाचे भजन करण्यासाठीच प्राप्त झाला आहे. म्हणून मनुष्याने इतर रंगात रंगण्याऐवजी ज्याने या विश्वातच रंग निर्माण केले अशा ईश्वराच्या रंगात रंगून जावे. त्यामुळेच संत तुकोबाराय देवापाशी हेच मागणे मागत आहेत. सध्याच्या काळात आपल्या मुलामुलींवर योग्य संस्कार करणे ही काळाची गरज असून मुलामुलींना मोबाईलसोबतच राजमाता जिजाऊ यांचे चरित्र देखील हाती देण्याचे गरज आहे. आपल्या मातीला महान अशी संत परंपरा लाभलेली आहे. संतांच्या चरणाची धूळ ही जगण्याचे कृतार्थ करणारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत नामसंकीर्तनाला महत्त्व दिले पाहिजे. ईश्वराचे नामसंकीर्तन जो करेल, त्याच्या जीवनात कायम सात्विकता राहील. शिवाय त्याला काहीही कमी पडणार नाही. त्यामुळे ज्येष्ठांनी आपल्या घरातील लहानग्यांना आतापासून ईश्वरी साधनेचा मार्ग दाखवावा. यातच समाजाचे सौख्य आहे.

याच कारणासाठी श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती फैजपूर, यावल व रावेर तालुका वारकरी भक्त व ग्रामस्थ मंडळी फैजपूर यांच्यातर्फे सामूहिक विठ्ठल नामजप व नामसंकीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. वैकुंठवासी नथूसिंग बाबा राजपूत दौरा मंडळ सप्ताह दि. 9 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान खंडोबावाडी मंदिर पाठीमागे फैजपूर ता. यावल येथे पार पडला. सप्ताह आयोजनाचे मुख्य कारण शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज समाधी चतु:शतकोत्तर रौप्य महोत्सव म्हणजे 425 व्या वर्षानिमित्त आणि ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथी भागवत जयंती चतु:शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी म्हणजेच 450 व्या वर्षानिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तसेच पंढरपूर येथील डिगंबर महाराज वारकरी शिक्षण संस्था पंढरपूर मठाचे अध्यक्ष हभप नरेंद्र नारखेडे व फैजपूर ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सप्ताह पार पडला. सामूहिक विठ्ठलनाम जपामुळे फैजपूरसह पंचक्रोशीतील परिसरात अध्यात्मिक ऊर्जेची निर्मिती झाली.

- Advertisement -

संत एकनाथ महाराज यांच्याविषयी सांगावयाचे झाल्यास संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. ’बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. एकनाथी भागवत हा संत एकनाथांचा एक महत्त्वाचा ग्रंथ असून वारकरीपंथास आधारभूत आहे. संस्कृतमधील भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील ही ओवीबद्ध मराठी टीका आहे. त्याची रचना इ.स. 1570 ते इ.स. 1573 या काळात झाली. सत्ताविसाव्या अध्यायात पूजाविधी आहे. सर्वांभूती समानता आणि भगवद्भाव हे नाथांच्या शिकवणीचे सार म्हणून सांगता येईल. भक्तीच्या द्वारे परमार्थाची प्राप्ती करून घेण्याचा सुलभ मार्ग प्रापंचिकांपुढे ठेवणे, हे या ग्रंथाचे प्रयोजन होते. आपल्या गुरूच्या आदेशावरून या ग्रंथाची रचना केल्याचे संत एकनाथ सांगतात. पैठण येथे असताना त्यांनी पाच अध्याय लिहिले. एकनाथांच्या एका चाहत्याने काशीस जाताना ते पाच अध्याय सोबत नेले. भागवत ग्रंथाचा हा प्राकृत अवतार पाहून काशीक्षेत्रात विद्वानांना क्रोध आला आणि त्यांनी एकनाथांना काशीस बोलावून घेतले. तेथे त्यांनी काशीच्या मणिकर्णिका घाटावर संपूर्ण भागवताची रचना केली आणि ती विद्वज्जनांपुढे मांडली. तेथे हा ग्रंथ विद्वज्जनांच्या पसंतीस उतरला आणि त्या ग्रंथाची त्याच विद्वज्जनांनी काशीमध्ये मिरवणूक काढली.

फैजपूर येथील खंडोबा मंदिर पाठीमागे विठ्ठलनामाचा सामूहिक नामजप दरम्यान दररोज सकाळी 8 ते 11 पार पडला. पंढरीनाथ महाराज आरू यांच्यासह वैकुंठवासी नथूसिंग बाबा दौरा मंडळातील व परिसरातील कीर्तनकार, टाळकरी व भाविक भक्त यांनी यात सहभाग घेतला.

अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर! पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यासंदर्भात एक ओवी आहे,

आधी रचिली पंढरी । नंतर वैकुंठ नगरी ॥

संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात,

जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ॥

पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर. कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णु यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे; म्हणूनच प्रत्येक हिंदू इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे, अशी इच्छा बाळगून असतो. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती करून समाजात भागवत धर्माची स्थापना केली आणि समाजात भागवत धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी नामदिंडीची, अर्थात् पंढरीच्या वारीची प्रथा चालू केली. विठुरायाच्या नामगजरात निघणार्या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते. पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तींचे तन, मन आणि धन सर्वकाही देवाच्या चरणी अर्पण होत असते. भगवंताच्या भेटीच्या ओढीने जो प्रवास केला जातो, त्यात मनाची निर्मळता असते आणि स्थूलदेहही चंदनाप्रमाणे झिजतो. त्यामुळे पंढरीला जाणारे वारकरी वारीच्या रूपाने तीर्थयात्रेलाच निघालेले असतात.

भगवान श्रीविष्णूचे कलियुगातील सगुण रूपातील अस्तित्व म्हणजे पंढरीनाथाची दगडी काळी मूर्ती होय. ती केवळ साधी मूर्ती नाही, तर श्रीविष्णूचा सगुण देह आहे. पृथ्वीवरील सगुणातील भक्ती करणारे सर्व जीव या मूर्तीकडे आपोआपच आकर्षित होतात. कोणाचेही निमंत्रण नसतांना लक्षावधी भाविक येथे येतात आणि अत्यानंदाने न्हाऊन निघतात. थकून भागून येणारा जीव जेव्हा पंढरीत दाखल होतो, तेव्हा काही काळासाठी त्या जिवाची उन्मनी अवस्था झालेली असते. पंढरीच्या वारीचे हेच आध्यात्मिक रहस्य आहे.

संत ज्ञानेश्वरांनी वारी या व्रताचा प्रारंभ केला. तेव्हापासून चालू असलेल्या वारीमुळे पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती जागृतावस्थेत आली आहे. वारकरी राम कृष्ण हरी असे नामसंकीर्तन सतत करत पंढरीस जातात. कलियुगात ईश्वराची कृपा संपादन करणार्या एका व्यक्तीपेक्षा सर्व मिळून जेव्हा कृपा संपादनाचा प्रयत्न करतात, तेव्हा ती समष्टी साधना होते. वारीमध्ये व्यष्टीसह समष्टी साधनाही होते आणि सर्व जिवांच्या उद्धारासाठी विठ्ठलाला पंढरपुरात भूतलावर यावेच लागते. या तीर्थाचा महिमाच असा आहे. येथील भक्तांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेच लागते. पंढरपूरच्या वारीने आपल्या जीवनात भक्तीचा अखंड झरा पाझरू लागतो. भावभक्तीचे बीज प्रत्येकाच्या अंतर्मनात रुजवणारी ही वारी पृथ्वीच्या अंतापर्यंत अशीच चालू रहाणार आहे.

भक्तांच्या संकटसमयी धावून येण्यासाठी, आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी विठ्ठल पंढरपुरात उभा आहे. देव भावाचा भुकेला आहे, याची प्रचीती घ्यायची असल्यास पंढरपूरला जावे. पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून आदर व्यक्त करत. पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, प्रत्येक जणच भगवत्स्वरूप झालेला असल्याने एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून एकमेकांप्रती आदर व्यक्त करत. पायांवर डोके ठेवण्याने अनेक लाभ होतात, उदा. दोहोंमधील चैतन्य एक होऊन दोहोंचेही तेज वाढण्यास साहाय्य होते. ‘मी’पणा, ताठा, अहंकार न्यून होतो. ‘सगळीकडे ईश्वर भरलेला आहे’, ही भावना बळावते. आपले अनुभव सांगत, नवीन रचना अभंग, भजने, ओव्या म्हणून दाखवत. प्रसाराच्या नवीन कल्पना सांगत. इतरांना मार्गदर्शन करत. प्रत्येक जण या मेळाव्यात उपस्थित असल्याचे इतरांना समजावे, यासाठी पताका बाळगत असे. तोच प्रघात आजतागायत चालू आहे.

यालाच अनुसरून पार पडलेल्या फैजपूर येथील समारंभात जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ॥ या विषयावर उमेश महाराज दशरथे यांनी चार दिवस तर डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी हरिमुखी गाता हरपली चिंता । या विषयावर तीन दिवस प्रवचन केले. सप्ताह दरम्यान संजय नाना धोंडगे महाराज, संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज महाराज गोसावी पैठणकर, रामभाऊ महाराज राऊत, पांडुरंग महाराज घुले, डॉ. जयवंत महाराज बोधले, संजय महाराज पाचपोर, अनिल महाराज बार्शी यांची कीर्तने तर समारोपाच्या दिवशी उमेश महाराज दशरथे यांचे काल्याचे किर्तन झाले. या सप्ताहामुळे कस्तुरसह पंचक्रोशीतील वातावरण अध्यात्म झाले होते. त्याचप्रमाणे 29 ते 31 डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या समरसता महाकुंभामुळे देखील अध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली या समरसता महाकुंभात भारतभरातील अनेक साधू महात्मे यांचे दर्शन व आशीर्वादाचा लाभ परिसरातील भाविकांना घेता आला. अशाप्रकारे एका मागोमाग पार पडलेल्या दोन्ही अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमामुळे फैजपूरसह पंचक्रोशीमध्ये अध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या