गणेशवाडी (वार्ताहर)
नेवासा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारात कांदा लिलावादरम्यान प्रतिक्किंटल ४,२०० व त्यापेक्षा अधिक दराची नोंद झाल्यानंतर या व्यवहाराच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्यातील इतर बहुतांश बाजार समित्यांमध्ये त्याच दिवशी एवढा उच्च दर नसताना घोडेगावमध्येच असा भाव कसा मिळाला, याची चौकशी बाजार समिती प्रशासनाने सुरू केली असून संबंधित तीन आडतदारांना नोटिसा बजावून खुलासा मागविण्यात आला आहे.
संबंधित आडतदारांना उच्चांकी दराने झालेल्या व्यवहाराची संपूर्ण माहिती, खरेदीदाराचे तपशील, विक्रीचा दर, मालाची अंतिम विक्री कुठे झाली तसेच व्यवहारातून झालेल्या नफ्याचा तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. या संदर्भात बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले की, संबंधित तीन आडतदारांकडून अहवाल मागविण्यात आला असून तो प्राप्त झाल्यानंतरच सविस्तर माहिती देता येईल. चौकशी सुरू असल्याने सध्या अधिक भाष्य करणे उचित ठरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चौकशीच्या पार्श्वभूमीवर संबंधित आडतदारांची दुकाने काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. आवश्यक प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती बाजारातील सूत्रांनी दिली. घोडेगाव बाजारातील या उच्चांकी दरामुळे शेतकरी वर्गात विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये तुलनेने कमी दर असताना घोडेगावमध्ये एवढा उच्च भाव कसा मिळाला, हा व्यवहार प्रत्यक्षात झाला की बाजारातील आवक वाढविण्यासाठी मोजक्या मालाला जास्त दर देण्यात आला, असा प्रश्न अनेक शेतकरी उपस्थित करीत आहेत.
काही शेतकऱ्यांच्या मते, काही वेळा मर्यादित प्रमाणातील कांद्याला जास्त भाव देऊन बाजारात आकर्षक दर मिळाल्याची चर्चा पसरविली जाते. त्यामुळे पुढील बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढते. त्यानंतर मोठे व्यापारी आवश्यक तेवढाच माल खरेदी करतात, तर उर्वरित माल कमी दरात विकावा लागतो. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. याशिवाय, लिलाव प्रक्रियेदरम्यान काही आडतदार एकमेकांच्या लिलावातच बोली लावत असल्याचे कथित व्हिडिओ चर्चेत असल्यानेही शंका व्यक्त होत आहे. प्रत्यक्ष बाहेरील खरेदीदारांची उपस्थिती कितपत असते, लिलाव प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे का आणि भाव निश्चित करताना संगनमत होत आहे का, अशा मुद्यांवरही शेतकरी प्रश्न उपस्थित करीत आहेत.
कांदा बाजारातील व्यवहारांबाबत शेतकऱ्यांचा विश्वास कायम राखण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. संबंधित व्यवहाराची कागदपत्रे, खरेदीदारांची माहिती, देयकांचे पुरावे तसेच लिलाव प्रक्रियेची पडताळणी झाल्यानंतरच या प्रकरणाचे वस्तुनिष्ठ चित्र स्पष्ट होईल.
घोडेगाव बाजारातील हा मुद्दा केवळ एका दिवसाच्या उच्चांकी दरापुरता मर्यादित नसून, लिलाव प्रक्रिया, खरेदीदारांची उपस्थिती, आडतदारांची भूमिका आणि भावनिर्धारणाची पद्धत यावरही प्रश्न निर्माण करणारा ठरत आहे. उच्च दराचा व्यवहार वास्तव आणि पारदर्शक असल्यास त्याचे पुरावे सार्वजनिक होणे अपेक्षित आहे. अन्यथा कृत्रिमरीत्या उच्च दराचे वातावरण निर्माण करून बाजारातील आवक वाढविण्याचा प्रयत्न झाला असल्यास त्याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसू शकतो. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने चौकशी अहवाल सार्वजनिक करून दोषी आढळणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करावी, तसेच भविष्यात लिलाव प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी सीसीटीव्ही निरीक्षण, डिजिटल लिलाव नोंदी, खरेदीदारांची स्पष्ट नोंद आणि व्यवहारांची ऑनलाइन पडताळणी यांसारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.




