Friday, February 13, 2026
Homeक्राईमAhilyanagar : घोडेगावात गोळीबारात तरूणाचा मृत्यू तर नगरमध्येही गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या

Ahilyanagar : घोडेगावात गोळीबारात तरूणाचा मृत्यू तर नगरमध्येही गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या

अहिल्यानगर येथील खासगी रूग्णालय परिसरातही पुन्हा दोन गटात हाणामारी || दोन संशयित ताब्यात

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गुरुवारी सायंकाळी दोन गटांमध्ये गोळीबाराची घटना घडली असून या घटनेत एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. नितीन शिरसाठ याचा मृत्यू झाला असून सुरज फुलमाळी याच्यावर पुणे येथे उपचार सुरु आहेत. गुरुवार दि. 12 रोजी सायंकाळी 6:30 वाजता घोडेगाव येथील घोडेश्वरी रूग्णालयासमोर दोन गटांमध्ये गोळीबाराची घटना घडली. यात नितीन शिरसाठ (वय 33) यांच्या छातीवर गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याच घटनेत सुरज फुलमाळी हा जखमी झाला.

- Advertisement -

गोळीबाराची घटना पोलिसांना समजताच सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, शिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यात शिरसाठ हे गंभीर जखमी झाले. दोघांना पोलिसांनी पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलवले. या रुग्णालय परिसरातही दोन गटामध्ये हाणामारी झाली. त्यानंतर सुरज फुलमाळी याला उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले. घोडेगाव येथे घटनास्थळी शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी भेट दिली. घोडेगावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

YouTube video player

दरम्यान पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत माहिती देताना याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. घोडेगाव हे अहिल्यानगर – संभाजीनगर महामार्गावरील अतिशय संवेदनशील ठिकाण आहे. घटना घडली त्यावेळी अचानक गोळीबाराच्या आवाजाने व्यापारी व ग्रामस्थ भयभीत झाले व सगळीकडे पळापळ झाली. सोनई पोलीस ठाणे हद्दीत गोळीबाराची दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. अंमळनेर येथे रोहित दरंदले याच्यावर जुन्या वादाच्या कारणावरून दोघांनी गोळ्या घातल्या. यात एक आरोपी अटक करण्यात आला असून एक फरार आहे.

Ahilyanagar : रिक्षा चालक सय्यद ऊर्फ जाबु ताब्यात; इतर संशयितांचा शोध सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिका निवडणुकीच्या वादातून दाखल केलेला ‘हाफ मर्डर’चा गुन्हा मागे घेण्यासाठी दोन लाखांची ऑफर देत दबाव आणला गेला आणि नकार दिल्यानंतर भररस्त्यात गावठी कट्ट्याने गोळी झाडून तरूणाला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना शहरातील कोठला परिसरात बुधवारी (11 फेब्रुवारी) रात्री घडली. अबरार मुक्तार शेख (वय 24, रा. प्रबुध्दनगर, आलमगीर, भिंगार) असे जखमी तरूणाचे नाव असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्याने उपचारादरम्यान गुरूवारी (12 फेब्रुवारी) दिलेल्या जबाबावरून गोळीबार करणारा सय्यद जैद रशीद ऊर्फ टैप्या, त्याचा साथीदार जाबीर सादीक सय्यद ऊर्फ जाबु तसेच या कटात सहभागी असलेले संशयित अफजल आसीर शेख, अस्लम आसीर शेख व अल्ताफ शेख (सर्व रा. मुकुंदनगर) यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबरार शेख याचे इंडिया टुर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचे कार्यालय पुणे बस स्टँड परिसरात आहे. सोशल मीडियावर माजी नगरसेवक समद खान यांच्या बाबत पोस्ट टाकल्याच्या रागातून अबरार शेख याच्यावर 3 जानेवारी रोजी अफजल आसीर शेख व अस्लम आसीर शेख यांनी चॉपर व गावठी कट्ट्याने खूनी हल्ला केल्याचा गुन्हा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल आहे.

अबरार याने दिलेल्या जबाबानुसार, 8 फेब्रुवारी रोजी गोविंदपुरा नाक्यावर सय्यद जैद रशीद उर्फ टैप्या याने त्याला अडवून अफजल व अस्लमविरूध्द दाखल केलेला केस मागे घे, दोन लाख रूपये देतो, नाहीतर पाहून घेईन, अशी धमकी दिली. तसेच ही धमकी अल्ताफ शेख यांच्या सांगण्यावरून दिल्याचे सांगत त्याने अबरारच्या गालावर चापट मारली होती. बुधवारी (11 फेब्रुवारी) रात्री 11 वाजताच्या सुमारास अबरार आपल्या ओळखीच्या व्यक्तीसोबत दुचाकीवरून मुकुंदनगरकडे जात असताना, कोठला परिसरातील रॉयल ट्रॅव्हल्स ऑफिससमोर अचानक एक ऑटो रिक्षा आडवी लावण्यात आली. ही रिक्षा जाबीर उर्फ बाबू सादिक सय्यद चालवत होता. रिक्षामधून टैप्या हा गावठी कट्टा हातात घेऊन खाली उतरला. परिस्थिती ओळखून अबरार पळत रॉयल ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात शिरला.

मात्र टैप्याने त्याच्या पाठलाग करत जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. ती गोळी अबरारच्या कमरेखाली डाव्या बाजूस लागली. गोळीबारानंतर टैप्याने अफजल आणि अस्लमवर केस करतोस काय? जिवंत सोडणार नाही, अशी शिवीगाळ करत धमकी दिली. परिसरात गर्दी जमू लागल्याने टैप्या व त्याचा साथीदार रिक्षातून पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रिक्षा चालक सय्यद ऊर्फ जाबु याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. इतर संशयितांचा शोध सुरू आहे. दरम्यान, शहरात भररस्त्यात झालेल्या या गोळीबारामुळे खळबळ उडाली असून, पूर्वीच्या गुन्ह्यातील तक्रार मागे न घेतल्याच्या सूडातून हा प्रकार घडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : चिमुकलींशी असभ्य वर्तन करणार्‍या शिक्षकास 6 दिवसांची पोलीस कोठडी

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरातील एका प्रतिष्ठीत प्राथमिक शाळेतील चिमुकलींशी असभ्य वर्तन करणार्‍या ‘त्या’ शिक्षकास न्यायालयापुढे हजर केले असता दि. 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोलीस...