अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्य शासनाकडून अंत्योदय व प्राध्यान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू, तांदळाचे नियमित वाटप केले जाते. परंतु मार्च महिन्यापासून रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून तांदळाऐवजी गव्हासोबत मका मिळणार आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात आठ केंद्रावर मका खरेदी करण्यात येत आहे. ही खरेदी केलेली मका रेशनदुकानातून लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. आतापर्यंत 15 हजार क्विंटल मका खरेदी करण्यात असून 28 फेब्रुवारीपर्यंत खरेदी सुरु राहाणार आहे. खरेदी करण्यात आलेली संपूर्ण मका लाभार्थ्यांना दिली जाणार असल्याने पुढील तीन महिने रेशनवर गव्हासोबत मका मिळण्याची शक्यता आहे.
अंत्योदय योजनेतील कुटुंबांना 10 किलो मका व 11 किलो गहू मिळणार आहे. तर प्राध्यान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन किलो गहू व एक किलो मका दिली जाणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे 87 हजार 64 कार्डधारक आहेत, तर 3 लाख 86 हजार 34 लाभार्थी आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेचे 6 लाख 37 हजार 114 रेशनकार्डधारक आहेत, तर 25 लाख 63 हजार 971 लाभार्थी आहेत. जिल्ह्यात नगर, घारगाव, श्रीगोंदा, घोगरगाव, मिरजगाव, शेवगाव, पाथर्डी व कोपरगाव येथील फेडरेशन केंद्रावर मका खरेदी केली जात आहे. तर जामखेड व संगमनेर येथील केंद्रावर शेतकर्यांची नोंदणी झालेली नाही.
दक्षता पथक स्थापन
फेडरेशन केंद्रावर शेतकर्यांकडून मका खरेदी करण्यात येत आहे. संबंधित तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता पथकाला फेडरेशन केंद्राच्या तपासणीचे अधिकार देण्यात आले आहेत. गैरप्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे.





