
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आ.संग्राम जगताप व आयुक्त यशवंत डांगे हे स्वतः रस्त्यावर उतरून शहरासाठी काम करत आहेत. त्यांच्याप्रमाणे आपणही सर्वजण शहरासाठी योगदान देऊन अहिल्यानगरचे नाव देशात नेऊ. जसा रस्त्यावरील कचर्याचे निर्मुलन करतो तसेच ई कचर्याचे निर्मूलन होणेही आवश्यक आहे. सर्व नगरसेवकांनी या अभियानात सहभागी होत आपापल्या प्रभागात ही मोहीम प्रभावीपणे राबवावी. यासाठी महानगरपालिका पूर्णपणे सहकार्य करेल. अहिल्यानगर शहराला पुढे नेण्यासाठी विचार भारतीने सुचवलेल्या सहा ‘स’ संकल्पना योग्य असून त्यावर काम करू, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले.
शहर विकासासाठी विचारभारती संस्थेच्या वतीने सुचवण्यात आलेल्या सहा मुद्यांची सुरूवात शहरात ई कचरा निर्मूलन मोहीमेने होणार आहे. 23 फेब्रुवारी रोजी राबवण्यात येणार्या या मोहिमेच्या नियोजनासाठी गुरूवारी (12 फेब्रुवारी) मनपा सभागृहात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीस महापौर गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, आयुक्त डांगे, विचार भारतीचे मार्गदर्शक रवींद्र मुळे, उपायुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्यासह महायुतीचे नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे व एनजीओचे प्रतिनिधी, महानगरपालिकेचे अधिकारी व विचार भारतीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले, महानगरपालिकेमध्ये आता चांगल्या विचाराने काम करणार्यांची सत्ता आली आहे. त्यामुळे भविष्यात शहरात चांगले विकास कामे करून दाखवू. विचार भारतीने सुचवलेल्या सहा संकल्पनांवर काम करून हे अभियान यशस्वी करू. आयुक्त डांगे म्हणाले, विचार भारती प्रेरणादायी विचारांचा जागर करत चांगल्या संकल्पना सुचवत आहे. त्यामुळे विचार भारती बरोबर काम करून ई- कचरा निर्मूलन अभियान महानगरपालिकेमार्फत राबवले जाणार आहे. येत्या 23 फेब्रुवारी रोजी शहरात प्रत्येक प्रभागात तसेच विविध ठिकाणी सेंटर उभारून सकळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे अभियान राबवले जाणार आहे.




