Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमघोडेगावात 26 गोवंश जनावरांसह 33 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घोडेगावात 26 गोवंश जनावरांसह 33 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई || 5 जणांवर गुन्हा दाखल

सोनई |वार्ताहर| Sonai

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घोडेगावात कत्तलीसाठी आणलेली 26 जनावरे ताब्यात घेऊन 33 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी 5 जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना घोडेगावात शेख वस्ती येथील फिरोज शेख याने कत्तलीसाठी जनावरे आणल्याची गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी त्वरीत गुन्हे शाखेच्या पथकाला छापा टाकण्याची सूचना केली.

- Advertisement -

सदर ठिकाणी छापा टाकला असता फिरोज रशीद शेख (वय 36) रा. घोडेगाव, लाला उर्फ आफताब हरुण शेख (वय 28), शुभम बाबासाहेब पुंड (वय 25) रा. माळीचिंचोरा या तिघांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान भारत भाऊसाहेब शहाराव (रा. फत्तेपूर) व जुनेद शेख (रा. मुंगी) हे दोघे पळून गेले. या ट्रकची (एमएच 11 सीएच 8599) पंचासमक्ष पाहणी केली असता 7 काळ्यापांढरे रंगाच्या जर्सी गाय भरलेल्या दिसल्या.

फिरोज शेख याचे राहते घरासमोरील कंपाऊंडच्या आत 19 काळे पांढरे रंगाचे जर्सी गाय त्यात खिलार जातीचा पांढर्‍या रंगाचा बैल विना चारा पाण्याचा डांबून ठेवलेला दिसला. सदर जनावरांची खरेदीचे बाजार पावत्या बाबत विचारपूस केली असता त्याने कोणत्याही प्रकारची पावती नसल्याचे सांगून ही जनावर माझीच असल्याचे सांगितले. कारवाईत 12 लाख 50 हजार रुपयांची 25 जर्सी लहान-मोठ्या गाई, 50 हजार रुपये किंमतीचा खिलार बैल व 20 लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा ट्रक असा एकूण 33 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

पोलीस नाईक सोमनाथ आसमानराव झांबरे (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम सन 1995 चे सुधारित 2015 चे कलम 5 (अ)(ब), 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागविणे कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार डी. एम. गावडे पुढील तपास करत आहे. सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, सहायक फौजदार रमेश गांगुर्डे, हवालदार हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, गणेश लोंढे संतोष खैरे, सुयोग सुपेकर, शामसुंदर जाधव, भीमराज खर्से, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, जालिंदर माने, प्रमोद जाधव, सारिका दरेकर, सुवर्णा गोडसे, उमाकांत गावडे, अरुण मोरे यांनी केली.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : जिल्ह्यात नऊ ठिकाणी केंद्रे; ६१९...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) एका जागेसाठी गुरुवारी (दि. १८) मतदान (Voting) होणार आहे. या...