मनमाड | प्रतिनिधी Manmad
भरधाव ट्रकखाली सापडून एका १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू तर तिच्यासोबत असलेला ८ वर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना शहरातून जाणार्या पुणे-इंदूर महामार्गांवर घडली. पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महामार्गांवर होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरिता आणि अपघात टाळण्यासाठी चार महिन्यापूर्वी महामार्गालगत असलेली सर्व अतिक्रमणे काढण्यात आली. अतिक्रमण काढण्यात आल्या नंतर देखील महामार्गांवर अपघाताची मालिका सुरूच आहे.
चांदवड तालुयातील शिंगवे येथें राहणारी कोमल संतोष पगारे (१९) आपल्या ८ वर्षीय भावासोबत कामानिमित्त मनमाडला आली होती. दोघे रस्त्याने पायी जात असताना मागून येणारा युपी-२५-एफटी-२२४९ या आयशर ट्रकने दोघांना धडक दिली. धडक इतकी जबर होती की कोमलचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला ८ वर्षीय बालक गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य करत जखमी बालकाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
पुणे-इंदूर हा महामार्ग शहराच्या मध्य भागातून जातो. दोन्ही बाजूला शहर असल्यामुळे नागरिकांना महामार्ग ओलांडून जावे लागते विशेषतः विद्यार्थ्यांना तर जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागते. गेल्या चार वर्षापासून महामार्गांवर वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यात अवजड वाहनाची संख्या जास्त आहे. सुसाट वेगाने जाणार्या वाहनांमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरला आहे. महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणामुळे अपघात होतात हे कारण दर्शवित प्रशासनाने या भागातील अतिक्रमण काढले होते.
अतिक्रमण हटवून देखील महामार्गांवर वाहतुकीची कोंडी कायम असून अपघाताची मालिका सुरूच आहे.त्यामुळे वाहतुकीची समस्या कायम स्वरूपी सोडविण्याची मागणी होत आहे.




