अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरात अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रार करण्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर संबंधितांकडून दगडफेक व मारहाण करण्यात आल्याची फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या हल्ल्यात मुलगी (वय 15) जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले.
याबाबत 36 वर्षीय महिलेने शुक्रवारी (14 ऑगस्ट) तोफखाना पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार अमन खलील शेख, फरिन आझाद शेख, आझाद शेख, राजु खलील शेख, शब्बो खलील शेख (सर्व रा. बालिकाश्रम रोड) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी रडत घरी आल्यानंतर तिने अमन शेख याच्यावर गंभीर आरोप केले. अमन याने घरात ओढून इच्छेविरूध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे मुलीने आई-वडिलांना सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यापूर्वीही दोन-तीन वेळा अशाच प्रकारे अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. तसेच, याबाबत कोणाला सांगितल्यास तिच्या भावांना व आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी देण्यात आल्याचेही मुलीने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर संशयिताने तिच्यासोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी मुलीचे वडील संबंधितांकडे गेले असता त्यांना शिवीगाळ केली. तसेच मुलीबाबत अश्लील व अपमानास्पद वक्तव्य करून धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादी महिलेने केला आहे. दरम्यान, 11 ऑगस्ट रोजी दुपारी कुटुंबीय घरी असताना त्यांच्या घरावर दगडफेक सुरू झाली. अमन याने विटेने मुलीच्या डोक्यात मारल्याने ती जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.




