पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. याच मोहिमेअंतर्गत आडगाव पोलीस ठाण्याच्या (Aadgaon Police Station) गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत दोन गावठी बनावटीचे कट्टे आणि आठ जिवंत काडतुसांसह (राउंड) दोन अट्टल संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी शहरातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
त्यानुसार पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-१) मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त (पंचवटी विभाग) शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. २३ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, परिसरातील काही संशयितांकडे अवैध गावठी कट्टे आहेत. या बातमीची शहानिशा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकाने तातडीने जाळे विणले.
पोहवा दादासाहेब वाघ, इम्रान शेख, पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर आणि मनोज मोरे यांच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस पथकाने संशयितांकडून ७४ हजार रुपये किमतीचे दोन गावठी बनावटीचे कट्टे आणि ८ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. याप्रकरणी सुजित युवराज मोहिते (२४, रा. विहंग सोसायटी, बीडी कामगार नगर, अमृतधाम) व ओमकार नंदकिशोर बागोरे (२६, रा. लक्ष्मीनगर, बाफना बाजाराजवळ, अमृतधाम, पंचवटी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरूद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक किशोर कुवर करत आहेत.
दरम्यान, ही धडक कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, पोलीस निरीक्षक गौतम वावळे, दिलीप राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, सतीश जगदाळे, उपनिरीक्षक किशोर कुवर, हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, शिवानी आव्हाड, निलेश काटकर, मनोज परदेशी, अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, प्रीतम बोराटे, दीपक भुजबळ, कुणाल राऊत, वैशाली बच्छाव आणि दिपाली शार्दूल यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या (Police) या कारवाईमुळे अमृतधाम व पंचवटी परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.




