अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मुलीला का छेडतो अशी विचारणा करत एका अल्पवयीन मुलाला (वय 16) लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना भिंगार येथील फकीरवाडा, गोविंदपुरा परिसरात 29 मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. जखमी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी (वय 46) दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 30 मे रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काशिफ असिफ सय्यद (रा. आलमगीर) व भय्यु (पूर्ण नाव माहिती नाही, दोघे रा. मुकुंदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी फकीरवाडा, गोविंदपुरा परिसरात राहतात. त्यांचा 16 वर्षांच्या मुलाला संशयित आरोपींनी 29 मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बुर्हाणनगर रस्त्यावरील दमडी मशीद येथे बोलावून घेतले. तू मुलीला का छेडतो असे म्हणत संशयित आरोपींनी त्याला लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून जखमी केले.
तसेच त्याला शिवीगाळ करून त्याचा मोबाईल जबरदस्तीने फोडून नुकसान केले. या घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलावर रूग्णालयात उपचार करण्यात आले असून त्याच्या वडिलांनी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार ए. पी. इनामदार करीत आहेत.




