नाशिक | प्रतिनिधी | Nashik
‘डिजिटल अरेस्ट’ आणि सरकारी तपास यंत्रणांच्या नावाखाली भिती दाखवून नाशिककरांना (Nashik) लुटण्याचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. शहर सायबर पोलीस ठाण्यात शुक्रवारी तब्बल ६४ लाख रुपयांच्या फसवणुकीचे (Fraud) दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. या दोन्ही प्रकरणांत चाेरट्यांनी ‘मनी लॉन्ड्रिंग’ आणि अटकेचा धाक दाखवून तक्रारदारांवर मानसिक दडपण आणले व लाखो रुपये उकळले आहेत.
कायदेशीर कारवाई व बदनामीच्या भितीपोटी नागरिक कोणतीही खातरजमा न करता चाेरट्यांच्या बँक खात्यावर कोट्यवधी रुपये वर्ग केल्याचे या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. दोन्ही गुन्ह्यांत (Case) मिळून तब्बल १४ हून अधिक मोबाईल व व्हॉट्सॲप क्रमांक आणि अनेक म्यूल बँक खात्यांचा वापर करण्यात आला आहे. याबाबत दाेन स्वतंत्र गुन्हे दाखस करण्यात आले असून म्यूल बँक खाते, माेबाईल नंबरनुसार सायबर पाेलीस (Cyber Police) तपास करत आहेत.
दिल्ली पोलिसांच्या नावे फसवणूक
अज्ञात सायबर चाेरांनी चार वेगवेगळ्या व्हॉट्सॲप क्रमांकांवरून सिडकाेत (Cidco) राहणाऱ्या एका तक्रारदारास ७ ते २६ नोव्हेंबर दरम्यान व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल आणि चॅटिंगद्वारे संपर्क साधला. आम्ही दिल्ली पोलीस दलातून बाेलत आहाेत, असे भासवून, ‘तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये सहभागी आहात,’ असे सांगत अटकेचा धाक दाखवला. तपासाच्या नावाखाली तक्रारदाराकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण १८ लाख रुपये वर्ग करून घेत आर्थिक फसवणूक केली.
सरकारी अधिकारी असल्याचे भासवून गंडा
या घटनेत सायबर चोरट्यांनी तब्बल १० वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांचा वापर करत तक्रारदाराशी २७ ऑक्टोबर ते दि. १७ नोव्हेंबरदरम्यान फोन व इंटरनेटद्वारे संपर्क साधला. स्वतः सरकारी तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवत तक्रारदारावर मानसिक दडपण आणले आणि अटकेची भिती दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर तब्बल ४६ लाख रुपये वर्ग करण्यास भाग पाडले.
नागरिकांसाठी आवाहन
डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही कायदेशीर प्रकार अस्तित्वात नसून पोलीस, सीबीआय, ईडी किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी करत नाही किंवा पैसे भरण्यास सांगत नाही. असा कोणताही कॉल आल्यास तत्काळ कॉल कट करा आणि जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा किंवा १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवावी.




