Tuesday, December 3, 2024
Homeनाशिक‘लाडकी बहीण’ योजनेपेक्षा महिलांना संरक्षण द्या : पवार

‘लाडकी बहीण’ योजनेपेक्षा महिलांना संरक्षण द्या : पवार

आडगांव येथे नाशिक पूर्वचे उमेदवार गणेश गिते यांच्या प्रचारार्थ सभा

पंचवटी । प्रतिनिधी Panvhavati

- Advertisement -

‘लाडकी बहीण योजना’ चांगली आहे. पण 960 बहिणींचा शोध लागत नाही, त्या बेपत्ता आहेत यावर काही उपाययोजना दिसत नाही.लाडकी बहीण योजनेपेक्षा स्त्रियांना संरक्षण दिले पाहिजे. आमचे सरकार आल्यास महालक्ष्मी योजनेतून महिलांना तीन हजार देऊन शेतकरी हिताचे निर्णय घेऊ, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले.

आडगांव येथे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेशभाऊ गिते यांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले की, सरकार शेतीविरोधी निर्णय घेत आहे. याला आवर घालण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले पाहिजे. शेतकर्‍यांना त्यांच्या मालाला हमीभाव देण्याची गरज पाहिजे. लोकशाही वाचविण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली. मोदी सरकार सामान्य जनतेविरोधात निर्णय घेत असते. राज्यातील महायुती सरकार सुद्धा जनतेविरोधात असून यावेळी सत्ता बदल करणे आवश्यक आहे.

लोकसभेला 300 ते 325 जागांची गरज असतांना मोदी 400 जागा निवडून येतील, अशी अपेक्षा ठेवत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना वाचविण्यासाठी जनतेने पण त्यांचा ‘400 पार’च्या नार्‍याला केराची टोपली दाखविली. लोकशाही वाचविण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना तयार करण्यात आली. या मतदासंघा अनेक इच्छुक होतो. परंतु गणेशभाऊ गिते यांना संधी देण्यात आली. त्यांना कामाचा दांडगा अनुभव आहे. नाशिकचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी कटिबध्द असल्याचेही पवार यांनी सांगितले. प्रास्ताविकात ज्येष्ठ नेते गजानन शेलार यांनी भाजपच्या तिन्ही आमदारांनी नाशिकची दुर्दशा केली असल्याचे सांगितले. ड्रग माफिया वाढून गुंडागर्दी फोफावली असल्याचे सांगितले. त्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जे. पी. शिंदे होते. तर काँग्रेसच्या धुळे येथील खासदार शोभा बच्छाव, महाविकास आघाडी मध्यचे उमेदवार वसंत गिते, महाविकास आघाडी देवळालीचे उमेदवार योगेश घोलप, माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर विनायक पांडे, शिवसेना उपनेते सुनिल बागुल, शिवसेना नेते दत्ता गायकवाड, प्रेस नेते जगदीश गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नानासाहेब महाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अतुल मते, काँग्रेसचे पदाधिकारी शरद आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष गजानन शेलार, काँग्रेसच्या नगरसेविका वत्सला खैरे,गजानन शेलार, भाकपचे नेते राजू देसले यांच्यासह यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतमजूर, शेतकरी, नागरिक, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धडा शिकवा
मोदींनी व्यवसायिकांचे 14 हजार कोटींचे कर्ज माफ केले असल्याचे शरद पवार म्हणाले.मात्र शेतकर्‍यांचे हाल त्यांना दिसले नाहीत. महाराष्ट्राचे उद्योगधंदे पळवले. महाराष्ट्राचे पाणी गुजरातमध्ये जाण्यासाठी काही हालचाली सुरू आहेत. त्यामुळे यांना कायमस्वरूपी धडा शिकवावा लागेल,असेही शरद पवारांनी सांगितले.

माझ्या आईला नांदूर गावी दमदाटी
15 वर्षात या मतदार संघात विकासकामे झालेली नाही. त्यामुळे या मतदार संघात बदल घडवून आणायचा आहे. नाशिक शहरासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवले. स्थायी समिती सभापतीपदाच्या कार्यकाळात सिटी लिंक बससेवा सुरू करून नाशिककरांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा दिलासा दिला. त्याचबरोबर 35 एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारून नाशिकला क्रीडा केंद्र म्हणून देश विदेशात ओळख झाली आहे.पेठरोडच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय घेत, त्यांनी वाढत्या रहदारीचा विचार करून नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. कोविड महामारीच्या कठीण काळात, बिटको हॉस्पिटल कोविड सेंटर म्हणून कार्यान्वित करण्यात आले. मी अनेक वाईट गोष्टींना सामोरे जात आहे. माझी आई माझा प्रचार करण्यासाठी आली तेव्हा दमदाटी करण्यात आली. तसेच सोबत असलेल्या माता – भगिनींना दमदाटी करण्यात आली. मला या मतदार संघात विकास घडवून आणायचा आहे. त्यामुळे सर्व मतदारांना विनंती करतो की मला आशीर्वाद द्यावा.
गणेश गिते, उमेदवार

    - Advertisment -spot_img

    ताज्या बातम्या