खडक माळेगाव | वार्ताहर Khadak Malegaon
परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार (दि.१९) दुपारी अडीच वाजेदरम्यान गवत आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्यावर बिबट्याने अचानक झडप घालत हल्ला केला. मात्र मुलाने प्रसंगावधान राखत जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या दिशेने धाव घेत आरडाओरड केल्याने बिबट्याने शेतकर्याला सोडून पळ काढला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असून मुलाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खडक माळेगाव येथील बाबूराव आहेर आणि त्यांचा मुलगा अंबादास आहेर हे दोघे दुचाकीवरून गवत आणण्यासाठी खडक माळेगाव-टाकळी शिवारातील काळे वस्ती परिसरात गेले होते. दुपारच्या वेळी दोघेही शेतात गवत गोळा करत असताना झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक बाबूराव आहेर यांच्यावर मागून झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आहेर यांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही. बिबट्याने त्यांच्या डाव्या खांद्यावर आणि मानेच्या मागील भागावर गंभीर जखमा केल्या. वडिलांवर बिबट्याचा हल्ला झाल्याचे पाहताच अंबादास आहेर यांनी क्षणाचाही विलंब न करता धाडसाने बिबट्याच्या दिशेने धाव घेत मोठ्याने आरडाओरड सुरू केली. अनपेक्षित प्रतिकारामुळे बिबट्याने बाबूराव यांना सोडून जवळच्या झुडपात पळ काढला. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
जखमी बाबूराव आहेर यांना तातडीने दुचाकीवरून लासलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोयाबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. खडक माळेगाव, टाकळी आणि आसपासच्या भागात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. यापूर्वीही अनेकदा बिबट्यांचे दर्शन झाले असून पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटनांनी ग्रामस्थांची चिंता वाढवली आहे. वनविभागाने यापूर्वी परिसरात लावलेल्या पिंजर्यांमध्ये अनेक बिबटे जेरबंद केले होते.
भरदुपारी हल्ल्यानंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून वनविभागाने परिसरात पिंजरे लावावे, गस्त वाढवावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. शेतकरी आणि नागरिकांसाठी जनजागृती मोहीम राबवून सुरक्षिततेच्या सूचना देण्याची मागणीही करण्यात आली.या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक नागरिक शेतात एकटे जाण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे. मुलाच्या धाडसामुळे बाबूराव आहेर यांचे प्राण वाचले असले तरी या घटनेने बिबट्यांच्या वाढत्या धोक्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




