Thursday, July 23, 2026
Homeनगरगोदावरी पट्ट्यात वाळू तस्करांमध्ये पुन्हा धूमश्चक्री; फायर झाल्याची चर्चा

गोदावरी पट्ट्यात वाळू तस्करांमध्ये पुन्हा धूमश्चक्री; फायर झाल्याची चर्चा

हद्दीचा वाद की आणखी काही?

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

वैजापूर व श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या गोदावरी नदीपात्र परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अवैध वाळू तस्करांमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण संघर्ष उफाळून आला. या धूमश्चक्रीदरम्यान काही जणांना बेदम मारहाण झाल्याची माहिती समोर येत असून, काहीजण गंभीर जखमी झाल्याचेही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, हवेत गोळीबार झाल्याची चर्चा परिसरात जोर धरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यांपासून श्रीरामपूर भागातील काही अवैध वाळू वाहतूक करणारे गट आणि वैजापूर परिसरातील स्थानिक घटक यांच्यात वर्चस्वाच्या कारणावरून तणाव निर्माण झाला होता.नदीपात्रातील वाळू उपसा, वाहतूक मार्ग आणि हद्दीच्या प्रश्नावरून दोन्ही बाजूंमध्ये सातत्याने वाद सुरू असल्याचे सांगितले जाते. शनिवारी रात्री एका चालकाला मारहाण झाल्याची माहिती गावात पसरल्यानंतर ग्रामस्थ आणि काही स्थानिक नदीपात्राच्या दिशेने गेले.
यावेळी समोर असलेल्या 20 ते 25 जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. कट्ट्यासदृश्य वस्तूमधून हवेत दोन ते तीन वेळा फायर करण्यात आल्याची चर्चा असून, त्यानंतर संतप्त जमावाने प्रतिकार करत संबंधितांना जशास तसे उत्तर दिल्याचे समजते.

या झटापटीत काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत असली तरी अधिकृत स्तरावर अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. गोदावरी नदीकाठचा हा भाग वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलीस स्टेशन तसेच श्रीरामपूर तालुक्याच्या हद्दीशी संबंधित असल्याने नेमकी कारवाई कोण करणार, याबाबतही संभ्रम व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, एवढी गंभीर घटना घडूनही उशिरापर्यंत कोणताही अधिकृत गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

अवैध वाळू उपशामुळे आधीच गोदावरी पट्टा संवेदनशील बनला असताना वारंवार होणार्‍या अशा घटनांकडे पोलीस व महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. एखादी मोठी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. गोदावरी परिसरातील वाढती दहशत, अवैध वाळू तस्करी आणि त्यातून निर्माण होणारे गुन्हेगारी जाळे रोखण्यासाठी तातडीने संयुक्त कारवाईची मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...