राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
पावसाने उघडीप दिल्याने नवीन पाण्याची आवक थांबल्याने नांदुरमधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. तीन दिवसात गोदावरीत 4 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. दरम्यान घाटमाथ्यावरील पावसाचा जोर मंदावल्याने नाशिकच्या धरणांमधील नवीन पाण्याची आवकही मंदावली आहे. येत्या 22 जुलै पर्यंत पावसाने ब्रेक घेतला असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे.
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील घोटी, इगतपुरी, भावली, भामच्या परिसरातील घाटमाथ्यावरील धबधबे सुरू झाले आहेत. काल दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाण्याची आवक दूरवरून दारणा, भावली, भाम, वाकीमध्ये सुरू आहे. दारणा काल सायंकाळी 6 वाजता 53.14 टक्क्यांवर पोहचले आहे. 7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 3799 दलघफू पाणीसाठा आहे. हे पाणी 3.8 टीएमसी आहे. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासात दारणाच्या भिंतीजवळ 63 मिमी पावसाची नोंद झाली. घोटी 69 मिमी, इगतपुरी 55 मिमी पावसाची नोंद झाली. 24 तासात 1.1 टीएमसी पाण्याची नव्याने आवक झाली होती. मात्र सकाळ नंतर पावसाचा जोर कमी झाला. भामला सकाळी 6 पर्यंत 119 मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी 6 वाजता भाममध्ये 48. 66 टक्के पाणी साठा झाला आहे. भावलीच्या भिंतीजवळ 102 मिमी पावसाची नोंद झाली. भावली 88.42 टक्क्यांवर पोहचले आहे. वाकीला 67 मिमी पाऊस झाला होता. वाकी 22.23 टक्क्यांवर आहे. वालदेवीला 76 मिमी पावसाची नोंद झाली. वालदेवी 70.87 टक्क्यांवर पोहचले आहे. कडवाच्या भिंतीजवळ 45 मिमी पावसाची नोंद झाली. कडवा 78.26 टक्के भरले आहे. मुकणेच्या भिंतीजवळ 58 मिमी पावसाची नोंद झाली. मुकणे 34.62 टक्के इतके भरले आहे. आळंदीला 64 मिमी पावसाची नोंद झाली. आळंदी 23.77 टक्के भरले आहे.
गंगापूर धरण समूहातील धरणांच्या पाणलोटातही काल पावसाने उघडीप दिली. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासात गंगापूरला 86 मिमी पावसाची नोंद झाली. आंबोलीला 98 मिमी, त्र्यंबकला 150 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूरमध्ये 70.18 टक्के पाणीसाठा झाला आहे. कश्यपीला 88 मिमी पावसाची नोंद झाली. कश्यपी 48.33 टक्क्यांवर पोहचले आहे. गौतमी गोदावरीच्या भिंतीजवळ 67 मिमी पावसाची नोंद झाली. हे धरण 82.71 टक्के भरले आहे. गौतमी गोदावरी धरणातून विसर्ग गंगापूरच्या दिशेने सुरू होता. तो काल पावसाअभावी बंद करण्यात आला.
नांदुरमधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. काल सकाळी 28934 क्यूसेकने विसर्ग या बंधार्यातून सुरू होता. पावसाने उघडीप दिल्याने हा विसर्ग सकाळी 9 वाजता बंद करण्यात आला आहे. नांदुरमधमेश्वर बंधार्यातून 47300 क्यूसेक पाण्याचा विसर्ग 3 दिवसात करण्यात आला. हे पाणी 4 टीएमसी इतके आहे. दरम्यान काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडी जलाशयात गोदावरीतून 22049 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू होती. या जलाशयात उपयुक्त साठा 30.49 टक्के झाला होता. उपयुक्त साठा 23.3 टीएमसी पाणी साठा तयार झाला आहे. मेंढेगिरी आहवालाप्रमाणे 65 टक्के म्हणजे 50 टीएमसी पाणी आवश्यक आहे. मांदाडे समितीच्या पुनर्विलोकन अहवालाप्रमाणे 58 टक्के म्हणजे 44 टीएमसी पाणी 15 ऑक्टोबर रोजी आवश्यक आहे.




