Saturday, April 11, 2026
HomeनगरAhilyanagar : गोदावरी नदीला पूर, प्रवरा दुथडी

Ahilyanagar : गोदावरी नदीला पूर, प्रवरा दुथडी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सोमवारी दिवसभरातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी धरणातील विसर्ग मात्र कायम आहे. नांदुर मधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 43882 क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीला छोटा पूर आला आहे. कमालपूर बंधारा पाण्याखाली गेला.

- Advertisement -

गेल्या तीन दिवसांपासून दारणा आणि गंगापूर धरणाच्या पाणलोटात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. घाटमाथा पावसाने झोडपून काढला, त्यामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. दारणा धरणाच्या पाणलोटात तीन अंकी पाऊस झाला. पाणलोटातील घोटीला 120 मिमी, इगतपुरीला 173 मिमी पावसाची नोंद झाली. भावली 149, वाकी 119, भाम 110 मिमी पावसाची नोंद झाली. दारणा धरणात काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत 1.3 टीएमसी नवीन पाण्याची आवक झाली. दारणा धरणातून 13160 क्यूसेकने विसर्ग करण्यात येत आहे.

दारणा समूहातील भावलीतून 948 क्यूसेक, भाममधून 3252 क्यूसेक, वाकीतून 363 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. हे पाणी दारणा धरणात दाखल होत होते. काल सकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 6.2 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दारणा समूहाच्या व्यतिरिक्त वालदेवीतून 1305 क्यूसेक, आळंदीतून 687 क्यूसेक, मुकणेतून 400 क्यूसेक, कडवातून 3620 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र अधूनमधून जोरदार आगमन होत होते. मागील दोन दिवसात पावसाने दमदार हजेरी लावली होती.

त्यामुळे गंगापूर धरणात 24 तासांत अर्धा टीएमसीहून अधिकचे पाणी दाखल झाले. गंगापूरमधून काल 6336 क्यूसेक विसर्ग सुरू होता. काल सकाळी सहा वाजता संपलेल्या मागील 24 तासात गंगापूरच्या पाणलोटातील आंबोलीने 176 मिमी पावसाची नोंद झाली. त्र्यंबकला 127 मिमी पावसाची नोंद झाली. गौतमी गोदावरीला 100 मिमी, गंगापूरला 36 मिमी, कश्यपीला 32 मिमी पावसाची नोंद झाली. काल दिवसभरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. काल सकाळपर्यंत एकूण गंगापूर मधून 4 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

जायकवाडी 54.45 टक्के जायकवाडीमध्ये 42223 क्यूसेकने विसर्ग दाखल होत होता. काल सायंकाळी 6 वाजता या धरणातील उपयुक्त साठा 54.45 टक्के इतका झाला होता. म्हणजेच उपयुक्त साठा 41.75 टीएमसी इतका झाला. तर मृतसह एकूण साठा 67.82 टीएमसी इतका झाला.

यंदा ‘समन्यायी’ चे संकट दूर होणार
नांदूर मध्यमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत 43882 क्यूसेक्सने, भंडारदरातून 8938 क्यूसेक्स, निळवंडे प्रवरातून 9610 क्यूसेक्स या वेगाने पाणी प्रवाहीत राहिले तर पुढील पाच दिवसांत जायकवाडी 65 टक्के पाणीसाठा होऊन समन्यायीचा विषय या वर्षासाठी संपुष्टात येईल.

उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग.

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

सह्याद्री घाटमाथ्यावर आषाढ सरींचे सोमवारीही तांडव सुरूच असल्याने धरणांत विक्रमी आवक झाली. परिणामी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा सोमवारी सायंकाळी 6 वाजता 8073 दलघफू (73.13 टक्के) तर निळवंडेचा 7069 दलघफू (84.76टक्के) झाला आहे. पाण्याची आवक सुरूच असल्याने भंडारदरातून 9774 तर निळवंडेतून 14415 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रवरा नदी दुथडी वाहत आहे.

पाणलोटात रविवारी धो-धो पाऊस झाला. या पावसाची नोंद 6-8 इंच झाली आहे. आषाढी सरींच्या तांडवामुळे धरणातील पाणी पातळी क्षणाक्षणाला वाढत असल्याने अधिक पाणी सोडण्यात येत होते. दरम्यान, आढळा धरण भरल्याने नदीमध्ये 277 क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने आढळा नदी प्रवाही झाली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून धो धो आषाढ सरी कोसळत असल्याने डोंगरदर्‍यांवरील पाणी वेगाने धरणाकडे झेपावत आहे. यामुळे धबधबे देखील कोसळू लागले आहे. रंधा धबधब्याचे तर रौद्र रुप पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत भंडारदरा धरणात (सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत) 876 दलघफू तर निळवंडेत 951 दलघफू नवीन पाणी जमा झाल्याने दोन्ही धरणांचे पोट विस्तारले आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर येत्या आठ दिवसांत दोन्ही धरणे ओसंडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भात रोपांचे प्रचंड नुकसान
सततच्या जोरदार पावसामुळे धरणात पाणीसाठा समाधानकारक झाल्याने लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. मात्र या आषाढसरींचे तांडव सुरू असल्याने भात खाचरांमध्ये पाणीच पाणी आहे. त्यामुळे भात रोपांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांपुढे अडचणी उभ्या राहिल्या आहेत. रोपांचे प्रचंड नुकसान झाल्याने भातपिकाचे उत्पादन घ्यायचे कसे?असा प्रश्न त्यांना सतावत आहे. जनजीवन गारठल्याने पशुधनही संकटात सापडले आहे. या शेतकर्‍यांना सरकारने त्वरीत मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

24 तासांत पडलेला पाऊस (आकडे मिमीमध्ये)

घाटघर 177, रतनवाडी 181, पांजरे 143, भंडारदरा 105, निळवंडे 48, आढळा 14, अकोले 41

24 तासांतील आवक (आकडे दलघफू)

भंडारदरा 876, निळवंडे 951, मुळा 903

‘मुळा’चा साठा 65 टक्क्यांवर

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल दिवसभर पावसाचे तांडव सुरूच असल्याने धरणात पाण्याची समाधानकारक आवक सुरू होती. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा जवळपास 65.51 टक्क्यांवर पोहचला. मुळा धरणात काल सायंकाळी 6 वाजता पाणीसाठा 17 हजार 33 दलघफू झाला असून कोतूळ कडून 10 हजार 342 क्युसेसने आवक सुरू होती. काल दिवसभर धरणात आवक स्थिर असल्याने मुळा धरणात गेल्या 24 तासांत 903 दलघफू पाणी दाखल झाले.

आतापर्यंत नवीन 8 हजार 128 दलघफू पाण्याची आवक झाली. पाणलोटात पाऊस सुरूच असल्याने पाण्याची आवाक सुरूच आहे.

ताज्या बातम्या

महिला आणि बालविकास विभागात मेगाभरती – मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai राज्यातील महिला तसेच बालकांसाठीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महिला आणि बालविकास विभागात लवकरच ८ हजार ६६९ पदे भरण्यात येणार...