Wednesday, September 2, 2026
HomeनगरRahata : गोदावरीतून जायकवाडीकडे 48 टीएमसी पाण्याचा विसर्ग

Rahata : गोदावरीतून जायकवाडीकडे 48 टीएमसी पाण्याचा विसर्ग

गोदावरीचे दोन्ही कालवे, जलद कालवाही वाहता

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

गोदावरीचा विसर्ग 11042 क्यूसेकवर आला आहे. विसर्ग कमी झाल्याने गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल सकाळी 6 पर्यंत एकूण 48 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मध्यम, तर काही ठिकाणी बुरबुर स्वरूपाचा पाऊस अधून मधून पडत आहे. पाऊस घटल्याने नवीन पाण्याची आवक कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आले आहे.

गंगापूर मधून 490 क्यूसेक, कडवा मधून 1554 क्यूसेक, भावली 290 क्यूसेक, पालखेड 2660 क्यूसेक, ओझरखेड 491 क्यूसेक, वाघाड 1013 क्यूसेक, तिसगाव 100 क्यूसेक, दारणा 4066 क्यूसेक, वालदेवी 599 क्यूसेक, भाम 879 क्यूसेक, आळंदी 243 क्यूसेक, करंजवन 820 क्यूसेक, पुणेगाव 304 क्यूसेक, कश्यपी 500 क्यूसेक, गौतमी गोदावरी 250 क्यूसेक असे विसर्ग सुरू आहेत. नांदुरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 11042 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. काल गुरुवारी सकाळी 6 पर्यंत गोदावरी नदीत 48 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे.

दरम्यान गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्याचा उत्तर भागात पावसाचे प्रमाण अल्प आहे. भीज पाऊस झाला. मात्र विहिरी, इंधनविहिरी तळात आहेत. चरातून पाणी वाहणे, डबके, बांधणी भरल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. भिज पावसाने खरिपाला जीवदान मिळाले असले तरी रब्बी आणि उन्हाळ्यातील विहिरींच्या पाण्याची काळजी लागून आहे.

दरम्यान गोदावरी कालव्यांना बुधवारी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे लाभक्षेत्राला दिलासा मिळाला आहे. आता या ओव्हरफ्लो मधून तलाव, बंधारे भरावेत अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या बाबत सकारात्मक असल्याने बंधारे भरतील. निळवंडेचेही आवर्तन सुरू असल्याने साठवण तलाव, बंधारे, ओढे नाले तुडूंब भरू शकतील. हे चित्र राहाता तालुक्यातील गावामध्ये दिसून येईल. मुसळधार पाऊस नसल्याने शेतकर्‍यांची भिस्त आता गोदावरी कालवे व निळवंडे कालवे यावर अवलंबून आहे.

काल सायंकाळी जायकवाडीत उपयुक्त साठा 93 टक्के इतका झाला होता. उपयुक्त साठा 71.30 टीएमसी इतका आहे. तर मृतसह एकूण साठा 97.36 टीएमसी इतका आहे. काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडी जलाशयात तीन तासात सरासरी 21487 क्यूसेकने विसर्ग सुरू होती. या धरणाचा साठा 85 टक्क्यांच्या पुढे सरकल्याने या धरणातून खाली गोदावरीत विसर्ग सुरू आहे. या धरणाच्या गेट मधून 4328 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. तर माजलगाव धरणाच्या दिशेने वाहणारा उजवा कालवा 1100 क्यूसेकने, डावा कालवाही 1100 क्यूसेकने सुरू आहे. या धरणातून एकूण विसर्ग 6528 क्यूसेकने सुरू आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : वाघाडीत ‘एमडी’चा साठा उद्ध्वस्त; तीन लाखांचे ...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati वाघाडी परिसरातील (Waghadi Area) वाल्मीक नगर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी दुपारी छापा (Raid) टाकून सुमारे तीन लाख रुपये...