Sunday, October 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime News : पेठ रोडवर चालु हाेती गुप्त घुसखोरी! गेल्या अडीच वर्षांत...

Nashik Crime News : पेठ रोडवर चालु हाेती गुप्त घुसखोरी! गेल्या अडीच वर्षांत ३० बांग्लादेशी गजाआड

सोयीस्कर भाड्याची घरे आणि रोजगाराची उपलब्धता ठरतेय कारण

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बांगलादेशातील (Bangladeshi) बेरोजगारी आणि गरिबीला कंटाळून अवैध मार्गाने भारतात (India) प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांसाठी (Citizen) नाशिक शहर सुरक्षित आश्रयस्थान ठरत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत नाशिक शहरातून तब्बल ३० हून अधिक अवैध बांगलादेशी महिला व पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नुकत्याच पंचवटीतील पेठ रोडवरील नवनाथनगरातून गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई करत दोन बांगलादेशी सावत्र भावांना गजाआड केले आहे.

- Advertisement -

​शहर गुन्हे शाखेच्या तपासात या घुसखोरांची खास कार्यपद्धती समोर आली आहे. हे घुसखोर पकडले जाऊ नयेत म्हणून साधेपणाने राहणे पसंत करत हाेते. पंचवटीत पकडलेले दोघे भाऊ दिवसभर पंचवटी आणि आडगाव परिसरात टाईल्स व फरशी फिटिंगचे काम करत हाेते. बाहेरच खाण्यापिण्याची सोय करून केवळ रात्री झोपण्यापुरतेच ते ५ बाय ८ किंवा १० बाय ८ च्या लहान खोल्यांमध्ये येत हाेते. या खोल्यांसाठी ते दरमहा २ ते ४ हजार रुपये घरभाडे देत होते. घरमालकांकडून कोणतीही सखोल पडताळणी व व्हेरीफिकेशन न होता खोल्या भाड्याने मिळत असल्याने नाशिकमध्ये राहणे त्यांच्यासाठी सुलभ ठरल्याचे समाेर आले आहे. ​

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकातील हवालदार प्रवीण वाघमारे व विशाल देवरे यांना नवनाथनगर येथे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार २ ऑक्टोबर २०२६ रोजी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेण्यात आले. ​त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलमांसह स्थलांतर व परदेशी कायदा १९४६ च्या कलम २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन १२ वर्षांपासून वास्तव्य

पकडण्यात आलेल्या दोन्ही संशयित भावांची मूळ नावे मोहम्मद मुशर्रफ हुसेन मुजीबुररहमान खोकन (वय ३२, सध्याचे नाव- रोनी अब्दुल शेख) आणि मोहम्मद सज्जत हुसेन आशिक (वय २४, सध्याचे नाव- आशिक अलीअकबर अन्सारी, दोघे रा. मीजीबाडी, जि. नोवाखाली, बांगलादेश) अशी आहेत. हे दोघे २०१५ पासून नाशिकमध्ये वास्तव्यास होते. भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्यानंतर त्यांनी बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड तयार करून घेतले होते. विशेष म्हणजे, टाईल्स फिटिंगच्या कामातून मिळणारी मजुरी ते हवाला आणि इतर अनधिकृत मार्गांचा वापर करून बांगलादेशातील आपल्या कुटुंबाकडे व पत्नीकडे पाठवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

​सोशल मीडियावरून लग्न

​बांगलादेशातील वाढती बेरोजगारी पाहता हे घुसखोर भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांची परवानगी न घेता डंकी रूट किंवा चोरट्या मार्गाने भारतात शिरकाव करतात. यापूर्वी नाशिकमध्ये पकडण्यात आलेल्या काही बांगलादेशी महिला व तरुणींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून विवाह (निकाह) केल्याचे आणि त्यानंतर भारतीय नागरिकत्वाचे पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले होते.

नाशिक ठरतेय बांगलादेशींचे सुरक्षित आश्रयस्थान!

​- गेल्या अडीच वर्षांत ३० हून अधिक घुसखोर गजाआड
– सोयीस्कर भाड्याची घरे आणि रोजगाराची उपलब्धता ठरतेय मुख्य कारण
– हवालाद्वारे मूळ गावी पाठवायचे पैसे
– नाशकात बारा-बारा तास टाईल्स व फरशी फिटींगचे काम


ताज्या बातम्या

Raj Thackeray : “देशात वोट चोरीमुळे वातावरण तापलंय अन् इथे…”; ...

0
मुंबई | Mumbai देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज (रविवारी) मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज...