मुंबई | Mumbai
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातील पुरावे असलेले फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र सुन्न झाला होता. वाल्मिक कराडच्या गँगने संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारहाण केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या प्रकरणी अखेरीस राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता राज्यपालांकडूनही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आज सकाळी धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला होता.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपावला होता. तसेच एसआयटी देखील स्थापन करण्यात आली. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी सीआयडीने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. वाल्मिक कराड हाच या घटनेचा मास्टर मांईड आहे, संतोष देशमुख यांनी खंडणीला विरोध केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असे सीआयडीने आपल्या आरोप पत्रात म्हटले होते. यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याबाबत दबाव वाढला होता.
त्यानंतर संतोष देशमुख यांची आरोपींनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली, त्यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात संतापाची लाट पसरली आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला आहे. दरम्यान आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा