लोणी |वार्ताहर| Loni
जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव आणि संगमनेर येथील 30 बेडच्या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून, 100 बेडमध्ये रुपांतर करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकट होण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर पाटपुरावा सुरु असल्याचे सांगून ना. विखे पाटील म्हणाले, अहिल्यानगर येथे यापूर्वीच सुमारे 18 कोटी रुपयांच्या निधीतून कार्डीयाक कॅथलॅबची सुरुवात करण्यात आली आहे. या सुविधेचा मोठा लाभ जिल्ह्यातील रुग्णांना होत असून या लॅबमधून आतापर्यंत 13 रुग्णांच्या अँजिओग्रॉफी, तीन रुग्णांच्या अँजिओप्लॅस्टी आणि 77 रुग्णांची टुडीईको चाचणी करण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयामध्ये क्रिटीकल केअर युनिट सुरु व्हावे यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले असून यासाठी उभारण्यात येत असलेल्या इमारतीचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे. गंभीर रुग्णांवर अहिल्यानगरमध्येच उपचार व्हावेत या उद्देशाने या क्रिटीकल केअर युनिटची उभारणी लवकरच पूर्ण होईल. आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळावा यासाठी जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमधून या योजनेच्या सुविधा देण्यात येत आहेत. 2024-25 या वर्षामध्ये जिल्ह्यातील 24 हजार 464 लाभार्थ्यांनी या योजनेच्या माध्यमातून आरोग्य सुविधेचा लाभ घेतला. शासनाच्या माध्यमातून या रुग्णालयांना 61 कोटी रुपयांची रक्कमही संबंधित रुग्णालयांना मंजूर झाली असल्याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.
अकोले, संगमनेर आणि कोपरगाव या ठिकाणी कार्यरत असलेल्या ग्रामीण रुग्णालयांचे रुपांतर 100 बेडमध्ये व्हावे अशी मागणी होत होती. त्या अनुषंगाने या बाबत आरोग्य मंत्र्यांबरोबरही झालेल्या बैठकीतून तीनही तालुक्यांच्या 30 बेडच्या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्यास मान्यता मिळाल्याने या तीनही तालुक्यांतील ग्रामीण रुग्णालये आता 100 बेडच्या रुग्णालयांमध्ये रुपांतरीत होण्याचा मार्ग सुकर झाला असून, जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांसाठी औषधे व साधनसामुग्रीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात गर्भलिंग निदान चाचणीबाबत अतिशय गांभीर्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागास देण्यात आल्या असून, जिल्हाधिकार्यांनीच याबाबतचा आढावा घेऊन सातत्याने या प्रकारांना आळा घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.




