नाशिक | प्रतिनिधी
भक्त असलेल्या विवाहितेस तू अप्सरा आहेस, असे म्हणत आध्यात्मिक जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदू अशोक खरातने ही पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात घडवून आणल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात त्याला मदत व सहकार्य करणारे ‘ते’ चार डॉक्टर कोण? भ्रूणहत्येचे हे रॅकेट किती खोलवर रुजले आहे? याचा छडा लावण्यासाठी एसआयटीने कंबर कसली असून, न्यायालयाने खरातला दुसऱ्या गुन्ह्यात ८ एप्रिलपर्यंत ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खरातला मदत करणारे ते डॉक्टर कोण?
स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याने पीडितेला शब्दांच्या जाळ्यात अडकवून तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. वारंवार झालेल्या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिली. ही बाब खरातला समजताच त्याने पितळ उघडे पडू नये म्हणून पीडितेला गर्भपाताची औषधे, गोळ्या देऊन भ्रूणहत्या केली. तपासात धक्कादायक बाब म्हणजे, हा गर्भपात करण्यासाठी खरातला शहरातील चार डॉक्टरांनी मदत केल्याचा संशय आहे. त्याने ही औषधे कुठून मागवली? त्या डॉक्टरांनी नेमकी कोणती भूमिका बजावली? आणि हा गर्भपात करताना भ्रूण किती महिन्यांचे होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एसआयटीने तपासाठी वेग दिला आहे.
संपादकीय : ३ एप्रिल २०२६ – विनाशकाले ‘ट्रम्प’बुद्धी
दरम्यान, खरातच्या या कृत्यामुळे महाराष्ट्रासह नाशिककर सुन्न झाले असून, आध्यात्मिक क्षेत्रात वावरणाऱ्या अशा ‘लांडग्या’ला कठोर शासन व्हावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. आता एसआयटीच्या तपासात त्या चार डॉक्टरांचे नाव निष्पन्न झाल्यास प्रकरणात मोठी अटक होण्याची शक्यता आहे.
आधार, पॅनकार्डचा गैरवापर ?
सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, खरातने पीडितेच्या नातलगांकडून आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या प्रती घेतल्या होत्या. आध्यात्मिक गुरुच्या नावाखाली त्याने या कागदपत्रांचा काही आर्थिक गैरवापर किंवा इतर गुन्ह्यांसाठी वापर केला आहे का? याचा तपास होणे गरजेचे आहे. एसआयटीचे उपअधीक्षक व कळवणचे एसडीपीओ किरणकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयाला सांगितले की, खरात तपासात सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याची सखोल चौकशी आवश्यक आहे.
व्हीसीमुळे ‘व्हीआयपी’ सोयींना चाप !
ऑनलाईन सुनावणीमुळे अकरा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातला वारंवार न्यायालयात नेण्या-आणण्याचा पोलिसांवरील ताण आता कमालीचा हलका झाला आहे. यामुळे पोलिसांची शक्ती, वेळ आणि मनुष्यबळ तर वाचलेच, पण प्रवासादरम्यान संशयिताला आपसूक मिळणारी ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’ आणि सुरक्षेचा धोकाही संपला आहे. तंत्रज्ञानाचा हा वापर पोलिस प्रशासनासाठी सोयीचा ठरला आहे.
न्यायालयाने दरडावले
खरातविरोधात जनमानसात तीव्र घृणा आणि संताप आहे. त्याला न्यायालयात प्रत्यक्ष आणणे सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते, असा दावा एसआयटीने गुरुवारी (दि. २) न्यायालयात केला. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) सुनावणी घेण्याची विनंती केली. मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एन. ईचपुराणी यांनी ही विनंती मान्य केली. सुनावणीदरम्यान तांत्रिक अडथळ्यामुळे खरातचा आवाज येत नव्हता, तेव्हा न्यायालयाने खरातला मोठ्याने बोला असे म्हणूण चांगलेच दरडावले.





